ऑनलाइन लोकमत
जमैका, दि. 4 - जमैकामध्ये धावपटूंची अजिबात कमतरता नाही. एकाहून एक सरस धावपटू त्यांच्याकडे आहेत. सध्या जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्ट याची तुलना एका 12 वर्षाच्या मुलीसोबत केली जात आहे. या मुलीने रविवारी पार पडलेल्या बॉईज अॅण्ड गर्ल्स चॅम्पिअनशिपमध्ये धावण्याचा एका नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. ब्रिआना लिस्टन असं या मुलीचं नाव असून कॅरेबिअन देशांमध्ये सर्वात वेगवान धावण्याचा रेकॉर्ड तिच्या नावावर झाला आहे.
12 वर्षाच्या या शाळकरी मुलीने फक्त 23.72 सेकंदात 200 मीटर शर्यत पुर्ण केली. लिस्टनसोबत या शर्यतीत सहभागी झालेल्यांच्या तुलनेत लिस्टनने 0.88 सेंकदआधीच शर्यत पुर्ण केली होती. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत लिस्टनने नवा इतिहास निर्माण केला आहे. याआधी 200 मीटर सीनिअर कॅटेगरीमध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड 1988 ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या फ्लोरेन्स ग्रिफिथ जोएनरच्या नावे होता. फ्लोरेन्सच्या 2 सेकंदआधी लिस्टनने शर्यत पुर्ण करत नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.
जमैकाची भविष्यातील धावपटू म्हणून उदयाला येत असलेली लिस्टन सध्या चौथीत शिकत आहे. चौथीत शिकत असलेल्या लिस्टनने 100 मीटर स्पर्धेतही भाग घेतला होता. यावेळीही लिस्टनने 11.86 सेकंदात शर्यत पुर्ण करत आपली शानदार कामगिरी कायम ठेवली. लिस्टनची कामगिरी पाहता तिची तुलना जमैकाचा विश्वविक्रमवीर धावपटू उसेन बोल्टशी केली जात आहे. भविष्यातील ओलम्पिक स्टार म्हणून लिस्टनकडे पाहिलं जात आहे. जेव्हा ती दहा वर्षांची होती तेव्हा पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर तिची दखल घेतली गेली होती.