अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्तीला पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. आता फ्रान्समध्ये वाहतुकीचा नियम मोडला म्हणून पोलिसांनी एका अल्पवयीन तरुणावर गोळी झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांचे खोटे उघड झाल्यावर तेथील लोकांमध्ये तीव्र संताप असून दोन दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे.
संतप्त जमाव पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ले करत आहे. देशातील विविध भागात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना सुरु आहेत. अनेक वाहनांना आगी लावण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर असून पोलिसांनी आतापर्यंत 150 लोकांना अटक केली आहे. तर २४ पोलीस जखमी झाले आहेत.
राजधानी पॅरिमध्ये मंगळवारी ही घटना घडली आहे. नानतेरे भागात वाहतुकीचा नियम मोडला म्हणून पोलिसाने एका अल्पवयीन तरुणाला गोळी मारली होती, यात त्याचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला पोलिसांनी त्या तरुणाने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला होता, असे कारण सांगितले होते. परंतू, या घटनेचा व्हिडीओ समोर आला आणि पोलिसांचा खोटेपणा उघड झाला. पोलिसांनी तरुणाला एकदम जवळून छातीवर गोळी मारली होती, हे दिसल्यावर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली.
नानतेरेतील हिंसक आंदोलन देशभरात पसरले. बस पेटवून देण्यात आल्या. तोलाउस शहरात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी अशाप्रकारे शुल्लक कारणासाठी तरुणावर गोळी मारण्याच्या प्रकाराचा सर्वजण निषेध व्यक्त करत आहेत. राष्ट्राध्यक्ष मॅक्रो यांनी देखील तरुणाची हत्या ही घटना अक्षम्य असल्याचे म्हटले आहे. तसेच फ्रान्सच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या वर्षी पोलिसांच्या कारवाईत १३ जणांचा मृत्यू झाला होता.