टोकियो- फ्रान्स सरकारनं जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. फ्रान्स सरकारनं देशातील मसूद अजहरच्या सर्व मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे चीननं नकाराधिकाराचा वापर करत संयुक्त राष्ट्रात मसूदचा बचाव केल्यानंतर फ्रान्सनंही ही कारवाई केली आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या मार्गात चीनने चौथ्यांदा खोडा घातला होता. यामुळे नाराज झालेल्या संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी (यूएनएससी) इशारा दिला आहे की, जर चीन आपल्या भूमिकेवर ठाम राहिला तर परिषदेतील सदस्य अन्य पर्याय स्वीकारू शकतात. अन्य पाऊले उचलण्यास भाग पाडू नका.चीनची ही भूमिका दहशतवादाविरुद्ध लढणे आणि दक्षिण आशियात स्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नातील अडथळा आहे. पाकिस्तानच्या भूमीवरील सक्रीय दहशतवादी समूह आणि त्यांचे प्रमुख यांना वाचविण्यासाठी चीनवर अवलंबून राहत असल्याबद्दल पाकिस्तानवरही या दूतांनी टीका केली. अमेरिकी काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेरमॅन म्हणाले की, अझहरवर प्रतिबंध लावण्यासाठी चीनने सहकार्य करावे.पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर अजहरची एक ऑडियो टेप समोर आली होती. यात भाचा उस्मानच्या हत्येचा बदला घेण्याची सूचना त्यानं दहशतवाद्यांना केली होती. मात्र चीननं संयुक्त राष्ट्रात जैश आणि अजहरचा संबंध नसल्याचा दावा केला. मसूदच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असाही दावा चीनकडून करण्यात आला. या प्रकरणी भारतानं मसूदच्या ऑडियो टेप संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला दिल्या. जैश आणि मसूदचे संबंध यामधून स्पष्ट होत होते. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड या देशांनी मिळून मसूद अझहरवरच्या बंदीचा हा प्रस्ताव आणला होता.चीन राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थायी सदस्य आहे. स्थायी सदस्य असल्यानं त्यानं नकाराधिकाराचा वापर करत मसूद अजहरवरच्या बंदीचा प्रस्ताव फेटाळला होता. चीनने याआधी 2009, 2016 आणि 2017 या साली मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला व्हिटो पावरचा वापर करुन विरोध केला होता. मसूद अझहरला बंदी घालण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदच्या 1267 अलकायदा प्रतिबंध समितीमध्ये फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिका यांनी 27 फेब्रुवारीला आणला होता.2017 मध्येही चीनने अजहर जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलं होतं. मसूद अझहरला पाठिशी घालण्याचे काम चीन नेहमी करत आलाय. त्यावेळी चीनने मसूद अजहर आजारी असून आता तो कोणत्याही दहशतवादी कृत्यात सहभागी नसल्याचं सांगितले होते.
फ्रान्स सरकार जैश-ए-मोहम्मदची संपत्ती जप्त करणार, मसूद अजहरला मोठा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 3:47 PM