ठळक मुद्देभारतात दररोज होत होत आहे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद.अनेक ठिकाणी वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचंही चित्र
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भारतात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशात तीन लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. अशा परिस्थिती देशात आता वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. असा परिस्थितीत फ्रान्सनं आपला मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांनी भारताला संकटकाळात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लेनिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा संदेश ट्वीट केला आहे. "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील नागरिकांना मी एकत्र राहण्याचा संदेश देत आहे. संघर्षाच्या या काळात फ्रान्स तुमच्यासोबत उभा आहे. या महासाथीनं कोणालाही सोडलं नाही. आम्ही तुमची मदत करण्यास तयार आहोत," असा इमॅन्युअल मॅक्राँ यांनी दिला आहे. सध्या भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १.६२ कोटींच्या वर पोबोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ८९ हजार ९२० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांकडून प्रवासावर निर्बंधभारताती कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर परिस्थिती पाहता हाँगकाँग आणि ब्रिटनसारख्या देशांनी भारताच्या नागरिकांवर प्रवासासाठी निर्बंध घातले आहे. तर अमेरिकें आपल्या नागरिकांना भारतात प्रवास करण्यासाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या आहे. तर दुसरीकडे भारतातून फ्रान्समध्ये जाणाऱ्या नागरिकांनाही १० दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. संयुक्त अरब अमिरातीनं भारत प्रवासावर १० दिवसांची बंदी घातली असून रशियानंदेखील पुढील आदेशापर्यंत भारतीय नागरिकांना व्हिजा जारी करण्यावर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या खासदारांनी व्यक्त केली चिंताभारतात वाढत असलेल्या कोरोनाच्या संकटावरून अमेरिकेच्या खासदारांनीही चिंता व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे खासदारांनी बायडेन प्रशासनाला भारताला सर्वतोपरी मदत करण्याचंही आवाहन केलं आहे. "आपल्याकडे गरजवंतांना मदत करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी आहेत आणि ही आपली नैतिक जबाबदारीदेखील आहे. भारतात एका दिवसात आतापर्यंतची कोरोनाबाधितांची सर्वाधिक नोंद झाली आहे. अमेरिकेकडे मोठ्या प्रमाणात लसीचा साठा आहे. परंतु भारतासारख्या देशांना तो देण्यासाठी नकार देत आहेत," असं ट्वीट डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार एडवर्ड मार्के यांनी केलं आहे. चीनकडूनही मदतीचा हातअमेरिकेनंतर भारताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चीनच्या माध्यमांनी चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांना प्रश्न विचारला होता. "चीन भारताच्या मदतीसाठी तयार आहे. कोरोनाची महासाथ ही संपूर्ण मानवांची शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या महासाथीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे," असं त्यांनी उत्तर देताना सांगितलं. "भारतात कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे याची माहिती मिळाली आहे. तसंच याचा सामना करण्यासाठी आणखी वैद्यकीय वस्तूंचा पुरवठाही कमी होत आहे. आम्ही भारताला आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार आहोत. जेणेकरून भारताला कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल," असंही वांग म्हणाले.