आपण अंधविश्वास पसरवणाऱ्या अनेक भोंदू बाबांबद्दल ऐकले असेल. अशाच एका भोंदू बाबाला थायलंडमध्ये (Thailand) पोलिसांनीअटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, हा बाबा आपल्या अनुयायांना मल खाण्याचा आणि मूत्र पिण्याचा सल्ला देत होता. एवढेच नाही, तर असे केल्यास आपण आजारी पडणार नाही, असेही तो सांगत होता.
बाबाच्या आश्रमावर पोलिसांचा छापा - मिळालेल्या माहितीनुसार, थावी नानरा (Thawee Nanra) असे या भोंदू बाबाचे नाव असून तो 75 वर्षांचा आहे. याला पोलिसांनी थायलंडच्या (Thailand) छैयाफुम (Chaiyaphum) येथून अटक केली आहे. हा बाबा एका जंगलात राहत होता. योथेच छापा टाकून पोलिसांनी त्याला अटक केली. या बाबासंदर्भात पोलिसांना अनेक गंभीर पुरावे मिळाले असून, याच पुराव्यांच्या आधारे त्याला कठोर शिक्षा देण्याची तयारी सुरू आहे.
बाबांचे अनुयायी आणि पोलिसांत झटापट -खबऱ्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एक महिला या बाबाकडे गेली होती. मात्र ती परत आलीच नाही. यानंतर, या बाबसंदर्भात माहिती मिळाली. मांध्यमांतील वृत्तानुसार, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस या बाबाला अटक करण्यासाठी गेले असता बाबाचे अनुयायी आणि पोलीस यांच्यात झटापट झाली होती. मात्र, पोलिसांनी बाबाला अटक केली आहे.
आश्रमात सापडले 11 मृतदेह - मिळालेल्या माहितीनुसार, या भोंदू बाबाच्या आश्रमात जवळपास डझनावर अनुयायी आणि ताबूतांसह 11 मृतदेह सापडले. हे मृतदेह बाबांच्या अनुयायांचेच असल्याचेही बोलले जात आहे. खरे तर, या बाबाचा आश्रम शहरापाहून बराच दूर एका जंगलात आहे. यामुळेच हा बाबा अद्यापपर्यंत पोलिसांपासून वाचून होता.