Telegram CEO Pavel Durov, Elon Musk vs Emmanuel Macron: ट्विटरचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांच्या अटकेबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना पॉवेलच्या अटकेचे कारण जगाला सांगण्यास सांगितले आहे. मॅक्रॉनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की पावेल डुरोवची अटक अराजकीय होती. पावेल दुरोवच्या अटकेबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. फ्रान्सचे सरकार हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याबाबत वचनबद्ध आहे आणि कायम राहील. मॅक्रॉन म्हणाले की टेलीग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांना फ्रेंच भूमीवर अटक करण्याचे कारण हे न्यायालयीन तपासाचा भाग आहे. या अटकेचा कुठल्याही राजकीय गोष्टींशी संबंध जोडू नये. त्याची अटक कुठल्याही प्रकारे राजकीय नाही.
मॅक्रॉनच्या यांच्या या पोस्टवर एलॉन मस्क यांनी ट्विट करून लिहिले की, तुम्ही त्याच्या अटकेच्या कारणाबाबत जगभरातील लोकांना अधिक माहिती दिली असती तर बरे झाले असते. यापूर्वी पावेलच्या अटकेनंतर २५ ऑगस्ट रोजी एलॉन मस्कने #FreePavel सोबत टेलिग्रामच्या सीईओचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये पॉवेल एका मुलाखतीदरम्यान एलॉन मस्क आणि ट्विटरचे कौतुक करत होते.
पावेल डुरोव यांना का अटक करण्यात आली?
डुरोव यांच्या अटकेचे प्रकरण न्यायव्यवस्थेच्या कक्षेत आहे आणि न्यायव्यवस्था पूर्ण स्वातंत्र्याने आपले काम करत आहे, असे फ्रेंच सरकारने सांगितले आणि डुरोवच्या अटकेशी संबंधित अधिकची माहिती देण्यास नकार दिला. पावेल २४ ऑगस्ट रोजी अझरबैजानहून पॅरिसला त्याच्या खासगी जेटने पोहोचला. त्यावेळी फ्रेंच मीडियानुसार त्याच्या अटकेसाठी आधीच वॉरंट जारी करण्यात आले होते. ताज्या माहितीनुसार, टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांच्यावर १२ गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप लावण्यात आले आहेत. यामध्ये पोर्नोग्राफी, संघटनात्मक फसवणूक, अंमली पदार्थांची तस्करी यासह अनेक प्रकरणांचा समावेश आहे. तसेच टेलिग्रामवर असलेल्या डेटावर नियंत्रण ठेवण्यात कंपनी अयशस्वी असल्याचा ठपकाही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.