पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन G20 परिषदेत सहभागी झाले होते. याशिवाय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा मिठी मारतानाचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोसोबत त्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम,’ असे लिहिले आहे. याचा अर्थही त्यांनी इंग्रजी आणि फ्रेंचमध्ये लिहिला आहे. मॅक्रॉन यांनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसंत केला जात आहे. यासंदर्भात लोकांमध्ये विविध प्रकारची चर्चाही होत आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या फोटोचे अनेक धोरणात्मक अर्थ आहेत, असे जागतिक कूटनीतीवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे.
मॅक्रॉन यांचा निशाणा कुणावर? -जियोपॉलिटिकल एक्सपर्ट व्हेलिना चाकारोव्हा यांनी म्हटले आहे की, गेल्या 14 जुलैला पॅरिसमध्ये झालेल्या पंतप्रधान मोदींच्या भव्य स्वागतानंतर फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी जोरदार संकेत दिले आहेत. “वसुधैव कुटुंबकम” हे स्लोगन प्रामुख्याने चीन आणि रशियासाठी लिहिली गेल्याचे मानले जात आहे. पाश्चिमात्य देशांच्या दृष्टीने चीन आणि रशिया हे जागतिक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणारे देश आहेत आणि त्यांच्यामुळे जगावर संकट येऊ शकते.
फ्रान्स, युक्रेन युद्धासंदर्भात सुरुवातीपासूनच रशियाचा विरोध करत आहे. याशिवाय चीनसंदर्भातही फ्रान्सचे चांगले मत नाही. एवढेच नाही, तर मॅक्रॉन यांनी आगामी ऑलिम्पिकमधून रशियाचा ध्वज काढून टाकण्याचाही आदेश दिला आहे.
मॅक्रॉन यांनी घेली पंतप्रधान मोदींची भेट - G20 शिखर परिषदेनंतर, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यात, दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक प्रदेशात प्रगत संरक्षण तंत्रज्ञान आणि प्लॅटफॉर्मचे डिझाइन, विकास आणि निर्मितीमध्ये भागीदारीच्या माध्यमाने भारत-फ्रान्स संरक्षण संबंध मजबूत करण्यासंदर्भात वचनबद्धता दर्शवली. तसेच, प्रादेशिक आणि जागतीक समस्यांचा सामना करण्यासाठी भारत-फ्रान्स सहकार्य वाढविण्यासंदर्भातही चर्चा झाली.
एका संयुक्त निवेदनात म्हणण्यात आले आहे की, डिजिटल, विज्ञान, तांत्रिक नवकल्पना, शिक्षण, संस्कृती, आरोग्य आणि पर्यावरणीय सहकार्य, आदी विषयांवरही या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.