गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात चीन एकीकडे रशियाच्या बाजूने उभा आहे. तर दुसरीकडे याच युद्धाचा हवाला देत रशियासोबत विश्वासघातही करत आहे. जवळपास गेल्या अडीच वर्षांपासून रशिया पाश्चात्य देशांनी लादलेल्या आर्थिक प्रतिबंधांचा सामना करत आहे. हेच कारण समोर करत चिनी बँकांनी राष्ट्रपति पुतिन यांना झटका दिला आहे.
चिनी बँकांनी रशियातील त्यांची मालमत्ता विकण्यास सुरुवात केली आहे. युक्रेन युद्धामुळे मॉस्कोवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्यांना आर्थिक भागीदारांसोबत व्यवसाय करणे आता कठीण होत असल्याचे चिनी बँकांचे म्हणणे आहे. न्यूजवीकने दिलेल्या एका वृत्तानुसार, रशियातील बिझनेस आउटलेट फ्रँक मीडियाने म्हटले आहे की, 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत बँक ऑफ चायनाने रशियातील आपली संपत्ती 37 टक्क्यांनी कमी करून 355.9 अब्ज रूबल (3.9 अब्ज डॉलर) एवढी केली आहे. तसेच इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायनाने आपली संपत्ती 27 टक्क्यांनी कमी करून 462.4 अब्ज रूबल (5.1 अब्ज डॉलर) केली आहे.
फ्रँक मीडियाने म्हटले आहे की, चीनी बँकेने अनेक देशांसोबत भेडसावत असलेली पेमेंट समस्या लक्षात घेत रशियातील आपल्या व्यापाराचा वेग कमी केला आहे. मात्र, चायना कंस्ट्रक्शन बँक आणि चायना अॅग्रीकल्चरल बँक, यांनी रशियातील आपल्या संपत्तीत अनुक्रमे 27 टक्के आणि 9 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे, असेही या वृत्तात म्हणण्यात आले आहे.
2022 मध्ये युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्यापासून रशिया आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापारात विक्रमी वाढ झाल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र, आता चिनी बँका रशियासोबत कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यास कचरत आहेत. कारण त्यांना पेमेंटची समस्या भेडसावू लागली आहे.