केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानं पाकिस्तान किती सैरभैर झाला आहे, हे आपण रोजच पाहत आहोत. आपल्या हातातून आता पाकव्याप्त काश्मीरही जाणार, भारत ते काढून घेणार, या भीतीनं त्यांची झोपही उडालीय. म्हणूनच रोज नवनव्या 'पुड्या' सोडण्याचा कार्यक्रम पाकिस्तानी नेत्यांनी सुरू केलाय. त्यातच त्यांनी आज पुढचं पाऊल टाकलं. अनेक चाचण्या केलेल्या 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी त्यांनी पुन्हा एकदा केली. आम्हाला कमी लेखू नका, हे भारत सरकारला, लष्कराला सांगण्याचाच त्यांचा हा प्रयत्न आहे. परंतु, ही धडपड हास्यास्पदच ठरलीय.
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं गझनवी क्षेपणास्त्र २९० किलोमीटरपर्यंत मारा करू शकतं. अण्वस्त्र वाहून नेण्याचीही या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी रात्री करण्यात आल्याचं ट्विट पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लगेचच या यशस्वी चाचणीबद्दल सैन्याचं अभिनंदनही केलंय. ही चाचणी म्हणजे भारताला इशारा देण्यासाठी केवळ दिखावा असल्याचं स्पष्ट होतं.
आम्हाला डिवचू नका, अन्यथा युद्ध करू, अणुहल्ला करू, अशी दर्पोक्ती पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकचे बरेच नेते करत आहेत. पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी तर युद्धाची तारीखही जाहीर केलीय. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या महिन्यात भारत-पाकिस्तान यांच्या युद्ध होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जनतेला सतर्क करण्यासाठी मी याठिकाणी आलो आहे. पाकिस्तानी लष्कराकडे जी हत्यारे आहेत ती फक्त दाखविण्यासाठी नाही तर त्याचा वापर करण्यासाठी आहे असा इशारा शेख रशीद यांनी भारताला दिला आहे.
जम्मू-काश्मीरमधील कलम-३७० हटवणं पाकिस्तानच्या भलतंच जिव्हारी लागल्याचं या विधानांमधून लक्षात येतं. काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्यासाठी त्यांचं अमेरिका, चीनपुढे रडगाणंही गाऊन झालंय. परंतु, त्यांचं खरं रूप अनेकदा जगासमोर आल्यानं कुणीच त्यांची बाजू घ्यायला तयार नाही. सगळ्याच महासत्ता भारताच्या पाठीशी उभ्या राहिल्यानं तर ते अधिकच बिथरले आहेत.