इस्लामाबाद : गगनाला भिडलेल्या महागाईमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या पाकिस्तानी जनतेवर आता पेट्रोल-डिझेल दरवाढीचा आणखी एक बॉम्ब आदळला आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तान सरकारने मंगळवारी मध्यरात्री पेट्रोलच्या दरात १७.५० रुपयांची, तर हाय स्पीड डिझेलच्या दरात २० रुपयांची वाढ केली. त्यामुळे पेट्रोल २९०.४५ रुपये लिटर, तर डिझेल २९३.४० रुपये लिटर झाले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्यामुळे दरवाढ करावी लागली, असे सरकारने म्हटले आहे. मागील १५ दिवसांत पाकमधील पेट्रोल-डिझेलचे दर ४० रुपयांनी वाढले आहेत. १ ऑगस्ट रोजी पेट्रोलच्या दरात १९.९५ रुपयांची तर डिझेलच्या दरांत १९.९० रुपयांची वाढ करण्यात आली होती. नव्या इंधन दरवाढीनंतर पाकमधील महागाई आणखी भडकणार आहे. यामुळे लोकांची चिंता आणखी वाढली आहे.
महागाईचा विक्रम मोडला जाणार....
जुलै २०२३ मध्ये पाकिस्तानातील महागाईचा दर २८.३ टक्के होता. बुधवारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर तो आणखी वाढेल. त्याआधी जूनमध्ये पाकमधील महागाई २९.४ टक्के होती. मे २०२३ मध्ये ती विक्रमी ३८ टक्क्यांवर होती. इंधन दरवाढीमुळे हा विक्रम मोडला जाऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.
भारतात पेट्रोल डिझेलच्या मागणीत घट
मान्सूनमुळे शेतीमधील थांबलेले काम आणि औद्योगिक कामकाजातील मंदीने ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात भारतात पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी झाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी ही आकडेवारी जाहीर केली. १ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिझेलचा वापर ५.७ टक्क्यांनी कमी होऊन २६.७ लाख टन झाला आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत डिझेलचा वापर वाढला होता. याचवेळी कडक उन्हाळ्यापासून दिलासा मिळविण्यासाठी वाहनांमध्ये एअर कंडिशनरचा वापर वाढला होता. मात्र, मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून डिझेलची मागणी घटू लागली. ८ टक्के घट होत पेट्रोलची मागणी ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात ११.९ लाख टन राहिली आहे.