पोर्ट-औ-प्रिन्स : हैतीमध्ये इंधनाच्या टँकरमध्ये झालेल्या स्फोटात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोट इतका मोठा होता की, त्याचा आवाज दूरवरच्या भागातही ऐकू आला. पंतप्रधान एरियल हेनरी यांनी मंगळवारी सांगितले की, कॅप-हैतीयन शहरात हा स्फोट झाला. या घटनेमुळे दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेबाबत अधिक माहिती पोलिसांनी तातडीने दिली नाही.
या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवांचा अभाव असल्याचे वृत्त ले नोवेलिस्ट या वृत्तपत्राने म्हटले आहे. डॉ कॅहिल टुरेन यांनी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचबरोबर, कॅप-हैतीयनमध्ये काम करणारे सिव्हिल इंजिनियर डेव्ह लारोस म्हणाले की, ते दुपारी 1 च्या सुमारास गाडी चालवत होतो, तेव्हा त्यांनी एक रुग्णवाहिका वाहन जवळ येताना पाहिले आणि रस्त्यावर लोकांचा जमाव जमला होता.
डेव्ह लारोस म्हणाले की, काही लोक या घटनेनंतर ट्रँकरमधून आणि रस्त्याने बादल्यांमध्ये तेल घेऊन जात होते. ते म्हणाले, 'आपला देश ज्या टप्प्यातून जात आहे ते अत्यंत दुःखद आहे.' दरम्यान, अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना हैतीचे माजी पंतप्रधान क्लॉड जोसेफ यांनी ट्विट केले की, "मला खूप दु:ख झाले आहे आणि पीडितांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो."