Zakir Naik in Pakistan, Wanted in India: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याला पाकिस्तानने निमंत्रण दिले आहे. भारतात झाकीर नाईकवर UAPA अंतर्गत मनी लाँड्रिंग आणि प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर झाकीर नाईकने मलेशियात पलायन केले होते. आता पाकिस्तानकडून मिळालेल्या निमंत्रणाची माहिती खुद्द झाकीर नाईकनेच दिली आहे. एका टॉक शो साठी पाकिस्तानात प्रमुख पाहुणा म्हणून त्याला आमंत्रित करण्यात आले आहे.
पाकिस्तानात तीन ठिकाणी कार्यक्रम
झाकीर नाईकने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्टर शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे की, तो स्वत: आणि त्याचा मुलगा पाकिस्तानच्या तीन शहरांमध्ये भाषण करणार आहेत. ते दोघे ५-६ ऑक्टोबरला कराचीमध्ये, १२-१३ ऑक्टोबरला लाहोरमध्ये आणि १९-२० ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी जनतेला संबोधित करतील.
भारतात परत येण्याबद्दल झाकीर नाईक काय म्हणाला?
अलिकडेच झाकीर नाईकने भारतात परतण्याबद्दल, त्याच्यावरील आरोपांबाबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एका पाकिस्तानी यू-ट्युबरच्या पॉडकास्टमध्ये बोलला. भारतात झालेल्या आरोपांमुळे आणि अटकेच्या भीतीमुळे झाकीर नाईक २०१६ मध्ये भारतातून मलेशियाला गेला होता. नाईक भारतात परतण्याबाबत कुत्सितपणे बोलला की, भारतात जाणे खूप सोपे आहे, पण तेथून बाहेर पडणे अवघड आहे. मी भारतात गेल्यावर रेड कार्पेट अंथरले जाईल आणि मला 'आत ये, तुरुंगात बस' असे सांगितले जाईल. मी भारताच्या यादीतील पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी आहे.
पंतप्रधान मोदींबाबतही विधान
दरम्यान, झाकीर नाईक असेही म्हणाला की, माझ्यावर अनेक आरोप झालेत पण एकही आरोप सिद्ध झालेला नाही. तसेच, पीएम मोदींबद्दल बोलताना तो म्हणाला की, आतापर्यंतच्या एकूण कारकिर्दीत मोदींची सुरूवातीची १० वर्षे खूप चांगली होती, पण २०२४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची लोकप्रियता कमी झाली आहे.