मॉस्को :
रशियाच्या नौदलाची मोस्कवा युद्ध नौका युक्रेनच्या लष्कराने बुडविली. त्यानंतर तिसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली असल्याचा दावा ‘रशिया वन’ या सरकारी वृत्त वाहिनीने केला. यामुळे रशियाचे युक्रेन युद्धाबाबत भविष्यात काय इरादे आहेत याविषयी उदंड चर्चा सुरू झाली.
‘रशिया वन’ च्या निवेदिका ओल्गा स्काबेयेवा यांनी सांगितले की, मोस्कवा युद्ध नौका बुडविल्यानंतर संघर्ष आणखी तीव्र होईल. तिसरे महायुद्ध सुरू झाले आहे. युक्रेन युद्धात नाटो देशांनी जरी भाग घेतला नसला तरी नाटो देशांच्या यंत्रणांबरोबर रशियाचा लढा सुरू झाला. मोस्कवा युद्ध नौका बुडविणे म्हणजे युक्रेनने रशियाच्या भूमीवरच हल्ला केल्यासारखे आहे, असे मत रशिया वन वृत्त वाहिनीवरील या कार्यक्रमात एका प्रेक्षकाने व्यक्त केले. पाश्चिमात्य देशांच्या तालावर युक्रेन नाचत असल्याचा आरोप रशिया वनच्या कार्यक्रमात करण्यात आला.