बाली : तैवानविरोधात चीनच्या सुरू असलेल्या आक्रमक हालचालींमुळे शांततेला धोका निर्माण झाला आहे. तैवान व त्या परिसरात शांतता तसेच स्थैर्य नांदणे अत्यंत आवश्यक आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना सांगितले. इंडोनेशियात आयोजिलेल्या जी-२० गटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांच्या राष्ट्राध्यक्षांची सोमवारी सुमारे तीन तास बैठक झाली.
हिंद-प्रशांत महासागरातील घडामोडी तसेच चीनने विविध प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकांबद्दल बायडेन यांनी शी जिनपिंग यांच्याकडे परखड मते मांडली. दोघांनीही मास्क घातले नव्हते. दरम्यान, तैवानबाबत चीन आपल्या भूमिकेवर ठाम आहे, हे यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेतून दिसून आले.
जागतिक चिंतेच्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करणारजागतिक विकास रुळावर आणणे, अन्न-ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणे आणि आरोग्य आणि डिजिटलशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे, यासारख्या महत्त्वाच्या आव्हानांवर बाली येथील जी-२० गटातील नेत्यांशी विस्तृत चर्चा करणार, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेच्या निमित्ताने इंडोनेशियातील बालीला रवाना होण्यापूर्वी दिली. या परिषदेसाठी सोमवारी संध्याकाळी मोदी इंडोनेशियात पोहोचले.
‘वादाचे रूपांतर संघर्षात होणे टाळावे’जो बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना सांगितले की, चीन व अमेरिका हे आपापसांतील मतभेदांवर तोडगा काढू शकतील. दोन्ही देशांमधील वादाचे रूपांतर संघर्षात होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अमेरिका व चीनने चर्चेच्या माध्यमातून जागतिक प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
रशियाकडून ४०० पेक्षा अधिक वॉर क्राइमखेरसन शहर रशियाकडून पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर येथील तपासकर्त्यांनी ४००हून अधिक रशियन वॉर क्राइम (युद्ध गुन्ह्यांचा) पर्दाफाश केला आहे. रशियाने ताब्यापासून मुक्त झालेल्या खेरसन प्रदेशात सैनिक आणि नागरिकांचे मृतदेह सापडत आहेत, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले. युक्रेनमध्ये अनेक ठिकाणी सामूहिक कबरी सापडल्या आहेत.