बाली : इंडोनेशियामध्ये आयोजिलेल्या जी-२० परिषदेतील विविध देशांच्या प्रमुख नेत्यांनी बाली येथील तिवरांच्या जंगलाला भेट दिली. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सॅल्यूट केला, तर मोदी यांनी त्यांना अभिवादन केले. त्याच्या आदल्या दिवशी परिषदेमध्ये आसनावर बसण्याआधी बायडेन मोदींकडे आले व त्यांनी हस्तांदोलन केले होते. जी-२० परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. बायडेन यांच्याशी झालेल्या भेटीचा एक व्हिडीओ मोदी यांनी शेअर केला आहे. त्यात बायडेन मोदी यांच्याकडे येत आहेत हे प्रथम त्यांच्या लक्षात आले नाही, असे व्हिडीओत दिसते. मात्र, त्यानंतर मोदी लगेच मागे वळले व त्यांनी बायडेन यांच्याशी हस्तांदोलन केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बायडेन यांना मोदी यांनी अभिवादन करताच बायडेन यांनी त्यांना सॅल्यूट केला. या घडामोडींतून भारत व अमेरिकेमधील घनिष्ठ संबंध दिसून येतात, असे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या तज्ज्ञांचे मत आहे.
मोदींच्या भूमिकेचा जी-२०कडून पुनरुच्चारसध्याचा काळ हा युद्धाचा नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना सप्टेंबर महिन्यात सांगितले होते. मोदी यांच्या या भूमिकेचा पुनरुच्चार करत जी-२० परिषदेने बुधवारी म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर लादलेले युद्ध ताबडतोब बंद करावे. मतभेदाच्या मुद्द्यांवर चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढावा. कोणत्याही प्रश्नावर युद्ध करून तोडगा निघू शकत नाही.