जकार्ता : जी 20 शिखर परिषदेसाठी इंडोनेशियातील बाली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी दाखल झाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी ढोल वाजवला. भारतीय समुदायाशी संवाद साधण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारतीय पोशाख आणि पगडी घातलेल्या लोकांच्या जमावाने हात जोडून आणि 'भारत माता की जय'च्या जयघोषात स्वागत केले.
कार्यक्रमस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्वत:ला रोखू शकले नाहीत आणि त्यांनी ढोलही वाजवला. हे पाहून ढोलताशांच्या आनंदाला पारावार उरला नाही. जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी बाली येथे पोहोचले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2018 मध्ये इंडोनेशियातील विनाशकारी भूकंप आणि मानवतावादी मदतीसाठी भारताच्या 'ऑपरेशन समुद्र मैत्री'ची आठवण करून दिली. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंध चांगल्या आणि कठीण अशा दोन्ही काळात मजबूत राहिले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जकार्ताला भेट दिली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, भारत आणि इंडोनेशियामध्ये जरी 90 सागरी मैलचे अंतर आहे, परंतु प्रत्यक्षात, 'आम्ही 90 सागरी मैल दूर नाही तर 90 सागरी मैल जवळ आहोत.' ते म्हणाले, ' ज्या वेळी भारतात भव्य राम मंदिर बांधले जात आहे, त्या वेळी आम्ही इंडोनेशियाच्या रामायण परंपरेची अभिमानाने आठवण करत आहोत.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 15 ऑगस्ट (2022) भारताने स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला, तर इंडोनेशियाचा स्वातंत्र्य दिन दोन दिवसांनंतर 17 ऑगस्ट रोजी येतो. दरम्यान, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. तर भारत 1 डिसेंबर 2022 पासून एका वर्षासाठी जी-20 चे अध्यक्षपद भूषवणार आहे.