गणेशोत्सव देशात मोठ्या उत्साहात साजरा झाला. साता समुद्रापारही बाप्पांची तितक्याच मनोभावे आणि पारंपरिक रितीरिवाजात पूजा केली जाते. दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही बहरीनच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने गणेशोत्सव मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात साजरा केला. बहरीनमधील १० ते १२ हजार लोकांनी गणेशोत्सवास हजेरी लावून आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेतले.
बहरीन येथील गणेशोत्सवाला ४० वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक मराठी मंडळाकडून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने आपल्या गणपती बाप्पांसाठी शिर्डीमधील साई बाबा मंदिराची प्रतिकृती तयार केली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्र मंडळाची स्वतः ची गणपती डेकॉरेटीवची टीम असून दरवर्षी १ महिना अगोदरपासून ही टीम सजावटीच्या कामाला सुरुवात करते. दररोज २-३ तास ऑफिस कामकाजानंतर हे लोक गणरायाच्या सेवेसाठी हजार होतात. या वर्षी या टीमने तयार केलेला सुंदर देखावा मुंबई, पुण्यामधील नामांकित देखाव्यांना लाजवेल असाच होता. बहरीनमधील सर्व भारतीय नागरिकांनी देखाव्याचे भरपूर कौतुक केले.
भारताबाहेर गेल्यानंतर तरुण पिढी आपले सण, उत्सव आणि परंपरा विसरून जाते. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव या तरुणाईवर पडतो अशी नेहमीच ओरड होते. मात्र, भारताबाहेर आम्ही आपल्या परंपरा आणि सण उत्सव तितक्यात आनंदाने आणि उत्साहात साजरे करतो. दिवाळी आणि गणेशोत्सवाची धूम आम्ही येथेही अनुभवतो, असे महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अभिजीत इगावे यांनी सांगितले.
बहरीनमधील महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ दरवर्षी ४० हून अधिक मराठी व नॉन-मराठी उत्सव, सण साजरे करते. मंडळाचं स्वतः चं ढोल पथक असून अखेरच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला भक्तिभावाने निरोपही दिला जातो. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवास बहरीनमधील फक्त मराठीच नाही तर उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील लोकही मनोभावे सहभागी होतात. या वर्षी मंडळाने दगडूशेठ गणपतीची आकर्षक मूर्ती स्थापन केली होती. या मूर्तीचे सुंदर-देखणे रूप पाहून गणेशभक्त मूर्तीच्या प्रेमात पडले. गणरायाला निरोप देताना लोकांच्या चेहऱ्यावरचा भाव गणराया पुढच्या वर्षी लवकर या हेच सांगत होता.