वॉशिंग्टन:गणेशोत्सव आला की सर्व वातावरण आनंदमयी होऊन जाते. विशेषकरून जेव्हा हा उत्सव सातासमुद्रापलीकडे, अमेरिकेत साजरा होतो, तेव्हा एक वेगळाच आनंद अनुभवास येतो. कोरोनामुळे गणेशोत्सवाच्या परंपरेत खंड नको म्हणून कोविडच्या सगळ्या सूचना पाळून, वॉशिंग्टन डी. सी. येथील मराठी कला मंडळाने यंदा गणेशोत्सव एका आगळ्या-वेगळ्या (संकरित) स्वरूपात साजरा केला.
वॉशिंग्टन डी. सी. भागातील मराठी कला मंडळाचे समस्त मराठी जन गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी शालेय जिमखान्यात एकत्र येऊन गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. परंतु, कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे सालाबाद प्रमाणे थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्याची सुतराम शक्यता नसतानाही मंडळाच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे हा उत्सव यंदा कार्यकारिणी समिती व विश्वस्तसमितीच्या मर्यादित उपस्थितीत मॅकनेर फार्म्स ड्राईव्ह, हर्नडन, व्हर्जिनियाच्या एका सभागृहात साजरा करण्यात आला. विशेषत: मराठी मंडळातील इतर सभासदांसाठी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करून त्यांनाही आनंदात सहभागी होता आले. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत सर्व उपस्थितांनी फेस मास्क वापरून व कोरोना संबंधित नियमांचे पालन करून सोहळ्याचा आनंद घेतला.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना, आरती व प्रसाद, व त्यानंतर ढोल, ताशा व लेझीमच्या गजरात काढलेली बाप्पाची विसर्जन मिरवणूक. उत्सवाची शोभा वाढवण्यासाठी येथील स्थानिक कलाकारांनी मोलाचा हातभार लावला. स्थानिक कलाकारांनी आपल्या गायन, नृत्य, व नाटकाच्या ऑनलाईन सादरीकरणातून सर्व मराठी रसिकांना अगदी मंत्रमुग्ध केले. दिवसभर चाललेल्या ऑनलाईन गणेशोत्सव व विविध कार्यक्रमांद्वारे मंडळाने स्थानिक भागातील मराठी जनांसाठी एक वेगळीच मेजवानी सादर केली. वॉशिंग्टन डी. सी. मराठी कला मंडळाच्या या उपक्रमामुळे "इच्छा तेथे मार्ग" ह्या वाक्प्रचाराची अनुभूती आपल्याला नक्कीच येते.