लंडन : कोरोना आणि इतर अनेक अडचणींवर मात करून ब्रिटनमधील ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ने (एमएमएल) यंदाही गणेशोत्सव धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरा केला. या काळात विविध नियमांचे काटेकोरपणे पालन करताना बाप्पाच्या भाविकांचे आरोग्य आणि सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले, हे विशेष.
यंदा अकरा दिवसांचा गणपती न बसवता दीड दिवसाचा गणपती बसवला होता व या उत्सवाचे एमएमएलने यू-ट्यूब आणि फेसबुकवरून प्रक्षेपण केले होते. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे जोरदार स्वागत करण्यात आले. या दिवशी प्रतिष्ठापना पूजा व आरती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी अथर्वशीर्ष सहस्रावर्तन, गणेश पूजा व इको-फ्रेंडली विसर्जन समारंभ करण्यात आला. विसर्जनानंतर श्री गणेशाची मूर्ती पाण्यात पूर्णपणे विरघळल्यानंतर ते पाणी बागा फुलवण्यासाठी वापरले गेले.
गणेशोत्सवातील पूजा, आरतीसह विविध कार्यक्रमांना केवळ ब्रिटनमधीलच नव्हे तर जगाच्या सर्व भागांतून भाविकांनी आपापल्या घरीच सुरक्षित राहून उत्साहपूर्वक हजेरी लावली. भाविकांना प्रसाद काळजीपूर्वक पॅक करून व स्वच्छतेचे नियम पाळून घरपोच देण्यात आला.बाप्पाचे लवकर विसर्जन केले याचा अर्थ विविध कार्यक्रम, समारंभ मात्र कमी झाले, असा मुळीच नव्हता.
दरवर्षीप्रमाणे एमएमएलच्या सदस्यांचे व भाविकांचे संपूर्ण ११ दिवस आॅनलाईन कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करण्यात आले. या विविधांगी कार्यक्रमांत स्थानिक तसेच भारतातील कलाकारांची हजेरी लक्षणीय ठरली. यात अवधूत रेगे व स्वप्नजा लेले, डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रेरणा फडणीस, सीमा भाकरे, डॉ. अस्मिता व आनंद दीक्षित, अरविंद परांजपे व सहकारी, नाद फाऊंडेशन, औरंगाबाद यांनी किशोरकुमार, मुकेश, मोहम्मद रफी व मन्नाडे यांच्या लोकप्रिय गीतांद्वारे रसिकांना जुन्या काळात नेले. लंडनमधील नारायण पी. एन. यांनी नीता गुल्हाने यांच्या साथीने भक्तिगीते गाऊन वातावरण भक्तिरसाने भारून टाकले.
गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा, योगाभ्यास, स्वादिष्ट अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ बनवण्याचे कौशल्य शिकवण्यासारखे उपक्रम घेण्यात आले. बच्चे कंपनीच्या कलागुणांना वाव देणाऱ्या बालदरबारने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. ऑनलाईन अंताक्षरीमध्ये तर अनेक जण रममाण होऊन अपले नृत्यकौशल्याही दाखवीत होते.
घरपोच प्रसाद, दर्जेदार कार्यक्रम
गणेशोत्सवाचे संपूर्ण ११ दिवस आमच्या मंडळाच्या कार्यकारी टीमने दर्जेदार कार्यक्रम देण्यासाठी अपार कष्ट घेतले, असे एमएमएल अध्यक्ष श्यामल पितळे यांनी सांगितले. एमएमएलसमवेत युवा पिढीचे जास्तीत जास्त सदस्य जोडण्याबरोबरच त्यांनी आपली पाळेमुळे विसरू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भाविकांना कुरिअरद्वारे पाठवलेल्या प्रसादामुळे त्यांना प्रत्यक्ष बाप्पाचे दर्शन घेतल्याचा तसेच बाप्पाचा प्रसाद मिळाल्याचा आनंद झाला, असेही त्यांनी सांगितले.