शारलट- गणेशोत्सवाची धूम गेल्या 8 दिवसांपासून देशभरात दिसून येत आहे. मात्र, साता समुद्रापारही बाप्पांचे तितक्याच मनोभावे आणि पारंपरिक रितीरिवाजात पूजा केली जात आहे. अमेरिकेतील शारलोट येथील गणेशत्सावाला 36 वर्षांची परंपरा आहे. येथील शारलट मराठी मंडळाकडून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. शारलटमध्ये आप्पा आणि गीता जोशी यांनी 36 वर्षांपूर्वी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अमेरिकेत गणरायाला विराजमान केलं. यंदा शारलटमधील या गणपती बाप्पांना चक्क अमेरिकन संसंदेसमोर विराजमान करण्यात आले आहे.
अमेरिकेत गेल्यानंतर तरुण पिढी आपले सण, उत्सव आणि परंपरा विसरून जाते. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव या तरुणाईवर पडतो, अशी नेहमीच ओरड होते. मात्र, अमेरिकेतही आम्ही साता आपल्या परंपरा आणि सण उत्सव तितक्यात आनंदाने आणि उत्साहात साजरे करतो. दिवळी आणि गणेशोत्वाची धूम आम्ही येथेही अनुभवतो, असे शारलोट मराठी मंडळातील ट्रस्टी राहुल गरड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच लोकमान्य टिळकांचा उद्देश केवळ भारतातच नाही, तर अमेरिकेतही साध्य होताना दिसतो, असेही ते म्हणाले. कारण, स्वातंत्र्य लढ्यात नागरिकांनी एकत्र यावे आणि चवळवळीला बळ मिळावे, यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना केली. पण, स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने आम्ही भारतीय अमेरिकेत एकत्र येतो. आता, लढा स्वातंत्र्याचा नसला तरी आपल्या परंपरा जपण्याचा आणि देशप्रेम व्यक्त करण्याचा आहे. त्यासाठी येथील मराठी माणसांचा नेहमीच आग्रह असतो, असेही राहुल गरड यांनी म्हटले. यंदाच्या गणपती उभारण्यासाठी चक्क अमेरिकन संसंदेचा देखावा येथील मंडळाने सादर केला आहे. अमेरिकन संसदेसोर बाप्पा विराजमान झाल्याचे आपणास पाहायला मिळते.
गणेश कमिटी : महेश भोर, अमोल तळप, पांडुरंग नाईक, मनिषा नाईक.शार्लट मराठी मंडळ ट्रस्टी : संदीप पाध्ये, राहुल गरड आणि दिपक वेताळ
सॉफ्टवेअर इंजिनिअर अमितने बनवली आकर्षक गणेशमूर्ती शारलट गणेश मंडळातील गणेश मूर्ती सर्वांचे आकर्षण ठरत आहे. तर या आकर्षक मूर्तीबद्दल अनेकांकडून विचारणाही केली जात आहे. मात्र, ही मूर्ती या मंडळाचे सदस्य आणि मूळचे नागपूरचे रहिवासी असलेल्या अमित कोलुरवार यांनी स्वत:च्या हातांनी बनविली आहे. मातीचा उपयोग करुन इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविल्यानंतर, सुंदर रंगात या मूर्तीला आकर्षक बनवले आहे. या मूर्तीचे संदुर-देखणे रूप पाहून गणेशभक्त नक्कीच तिच्या प्रेमात पडतील. विशेष म्हणजे अमेरिकेत गणेशमूर्ती मिळणे खूप कठीण आहे. त्यामुळे व्यावसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अमित यांच्या कलात्मक हातांनी ही गणेशमूर्ती साकारण्यात आली. अमित यांचे वडिल रमेश कोलूरवार हे मूर्तीकार आहेत, त्यामुळे लहानपणपासूनच अमित यांनी मूर्तीकला शिकली होती. विशेष म्हणजे अमिरेकत लठ्ठ पगाराची नोकरी असतानाही आपला इतिहास आणि मूर्तीकला ते विसरले नाहीत हे विशेष.
पाहा व्हिडीओ -