इडुक्की- फिलिस्तीनच्या संघटनेने इस्त्रालयवर केलेल्या हल्ल्यात ३० वर्षीय भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सौम्या संतोष इस्त्रालयच्या अश्कलोन शहरातील एका घरी वृद्ध महिलेच्या देखभालीचं काम करते. केरळमधील सौम्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा सौम्या तिच्या पतीसोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधत होती. तेव्हा व्हिडीओ कॉलमध्ये अचानक जोरदार आवाज ऐकायला आला. फोन कट झाला आणि त्यानंतर आम्हाला तेथील मित्रांकडून कळाले की, हल्ला झाला आहे असं पती संतोषच्या भावाने सांगितले.
सौम्या ज्या इमारतीत राहत होती त्या इमारतीवर रॉकेट पडलं. त्यात सौम्या आणि वृद्ध महिला दोघेही मारल्या गेल्या. सौम्या मागील १० वर्षापासून इस्त्रालयच्या अश्कलोन येथे केअरटेकर म्हणून काम करते. मागील ४ वर्षापूर्वी २०१७ मध्ये ती भारतात आली होती. सौम्या राहत असलेल्या परिसरातील मल्ल्याळी समुदाय फिलिस्तीन आणि इस्त्रालयच्या संघर्षामुळे दहशतीच्या सावटाखाली असतात.
९ वर्षाचा मुलगा झाला पोरका
सौम्याचे पती संतोष शेतकरी आहेत. या दाम्पत्याचा ९ वर्षाचा मुलगा आहे. जो सौम्याच्या जाण्यानं पोरका झाला आहे. सौम्याच्या कुटुंबातील एकाने सांगितले की, जसं मी स्फोटाचा आवाज ऐकला तसं मी धावत तिच्या घराकडे गेली जिथं ती काम करत होती. परंतु तिथे पोहचताच सगळं घर उद्ध्वस्त झालं होतं. सौम्या आणि ती वृद्ध महिला मृत्युमुखी पडली होती.
दरम्यान, जेरूसलेमच्या अक्सा मशिदीबाहेर सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यामध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर हमास संघटनेने इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची भाषा सुरु केली. इस्रायलने जेरूसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले आहे. जेणेकरून याठिकाणी यहुदी नागरिकांना राहता येईल. यावरुन पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलमध्ये सातत्याने निदर्शने करत आहेत.
नेत्यानाहू म्हणाले
इस्रायल लष्कराने ट्विटमध्ये म्हटले आहे की, हवाई हल्ल्यात तीन हमास कार्यकर्त्यांना निशाना बनविण्यात आला आणि त्यांना ठार करण्यात आले. याचबरोबर 'देश मोठ्या सामर्थ्याने प्रत्युत्तर देईल', असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. तसेच, जेरुसलेमच्या दिवशी, गाझामधील दहशतवादी संघटनांनी लाल रेषा ओलांडून जेरुसलेमच्या हद्दीत क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, असे बेंजामिन नेतान्याहू म्हणाले.