इस्रायली सैन्याने गाझा पट्टीतून माघार घेतल्याच्या वृत्तादरम्यान, हमासचा एक मोठा कमांडर ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आयडीएफचे म्हणणे आहे की, त्यांच्या सैनिकांनी 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात हमास कमांडर एदेल मेस्माहला हवाई हल्ल्यात ठार केले आहे. तो दीर अल-बलाहच्या नजाबा कंपनीचा कमांडर होता. यासोबतच इस्रायलने लेबनानमधील हिजबुल्लचे अनेक तळही उद्ध्वस्त केले आहेत. लेबनान सीमेवरून दहशतवादी सातत्याने रॉकेट डागत आहेत, मात्र इस्रायल ते हवेतच उद्ध्वस्त करत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात 22 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे. 70 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रायली लष्कर उत्तर आणि दक्षिणेसह मध्य गाझामध्ये जोरदार हल्ले करत आहे. आयडीएफने मंगळवारी दक्षिण गाझामधील खान युनिसवर टँक आणि लढाऊ विमानांनी हल्ला केला. या काळात अनेक दहशतवादी मारले गेले. गाझातील लोकांचे म्हणणे आहे की इस्रायली रणगाड्यांनी मध्यभागी असलेल्या अल-बुरेज निर्वासित छावणीच्या अनेक भागांवर गोळीबार आणि बॉम्बफेक केली आहे.
गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत 207 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यांत मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची एकूण संख्या 22,000 पेक्षा जास्त झाली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट म्हणाले की, हा हल्ला खान युनिसच्या आसपासच्या बोगद्याच्या नेटवर्कवर केंद्रित होता, जिथे हमास नेते लपले होते. विशेष म्हणजे जागतिक दबावाखाली इस्रायलने गाझामधील काही भागातून आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली असताना हे हल्ले होत आहेत. मात्र युद्धबंदीची घोषणा झालेली नाही.
IDF ने उत्तर गाझा आणि भूमध्य सागरी किनाऱ्यालगतच्या अनेक ठिकाणी हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केलं आहे. आयडीएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमच्या सैन्याने जबलिया भागात अनेक दहशतवाद्यांना ठार केलं आहे. यामध्ये स्फोटके पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. काही दहशतवाद्यांनी ड्रोन चालवले. त्यांच्याकडे घातक शस्त्रे होती, जी ते आमच्या विरोधात वापरू शकतात. खान युनिस आणि अल-ब्यूरिज येथील यूएन शाळेतील रॉकेट लॉन्चिंग पॅड देखील नष्ट केले.
इस्रायली लष्करही नागरिकांवर हल्ले करत असल्याचा दावा पॅलेस्टिनी वारंवार करत आहेत. विशेषतः निर्वासित शिबिरांना लक्ष्य केलं जात आहे. इस्रायली लढाऊ विमाने आणि टँकनी खान युनिसच्या पूर्व आणि उत्तरेकडील भागांवर बॉम्बफेक केली आहे, जिथे हजारो विस्थापित पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे. पॅलेस्टिनी रेड क्रिसेंटने सांगितलं की, इस्रायली सैन्याने खान युनिस येथील मुख्यालयावर हल्ला केला. त्यामुळे तेथे आश्रय घेतलेल्या अनेक विस्थापितांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.