युद्धग्रस्त गाझामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. अनेक दिवसांपासून जुन्या झालेल्या तंबूत राहणाऱ्या लोकांकडे अन्न नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही, औषधं नाहीत आणि पुरेसे कपडे नाहीत. भयंकर थंडीमुळे लहान मुलांच्या मृत्यू होत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. आई-वडील आपल्या मुलांना थंडीने आपल्या डोळ्यांसमोर मरताना पाहत आहेत पण ते काहीही करू शकत नाहीत.
अन्न, इंधन आणि औषधांच्या कमतरतेमुळे गाझामधील कुटुंबांना ज्या गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, त्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला आहे. इथली आरोग्य सेवा लवकरच पूर्णपणे कोलमडू शकते असं म्हटलं आहे. यूएनने यापूर्वी देखील गाझा पट्टीतील लोकांच्या वाईट परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती परंतु आताही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.
याह्या अल-बट्रान या महिलेची गोष्ट काळजात चर्र करणारी आहे. आम्ही आमच्या डोळ्यांसमोर आमची मुलं मरताना पाहत आहोत असं म्हटलं आहे. गेल्या एका आठवड्यात थंडीमुळे मृत्यू झालेल्या ७ मुलांमध्ये नवजात बाळ जुमाचाही समावेश आहे. एका कुटुंबात आठ मुलं आहे. मात्र एकच ब्लँकेट आहे. आपली मुलं या थंडीचा सामना करू शकतील की नाही या भीतीने पालक प्रत्येक क्षणी जगत आहेत.
इथल्या अनेक कुटुंबांना फक्त युद्धाचाच फटका बसला नाही, तर कडाक्याच्या थंडीमुळे देखील त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आमच्याकडे ब्लँकेट आणि कपडे नाहीत. थंडीमुळे मुलं काळी-निळी पडत आहेत असं काही लोकांनी म्हटलं आहे. गाझामध्ये अनेक ठिकाणी अत्यंत भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे.