म्युनिक: वस्तुविनिमय प्रणाली जगजाहीर आहे, तुम्हाला सर्वांनाच या प्रणालीबद्दल कल्पना असेल याबाबतची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. ग्रामीण भागात मागील २०-२५ वर्षांपूर्वी या प्रणालीचा वापर केला जायचा. मात्र आता काळाच्या ओघाप्रमाणे परिस्थिती बदलत गेली आणि यामध्येही बदल झाला. पूर्वीच्या काळात वस्तुविनिमय पद्धत अनेकदा व्यवहारांसाठी वापरली जायची परंतु आता ती संपुष्टात आली आहे. आजच्या धावपळीच्या जगात लोकांनी या प्रणालीकडे कानाडोळा केला मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे ही प्रणाली पुन्हा जिवंत झाल्याचे पाहायला मिळते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपातील अनेक देशांमध्ये खाद्यतेलाचा तुटवडा भासत आहे. दरम्यान अशा संकटात जर्मनीतील दक्षिण म्युनिकमधील गीझिंगर ब्रुवरी नावाचा बार लोकांना खाद्यतेलाद्वारे बिअरसाठी पैसे देण्याचा पर्याय देत आहे. बारच्या या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना १ लिटर सूर्यफूल तेलावर १ लिटर बिअर दिली जाणार आहे. बारचे मॅनेजर ॲरिक हॉफमन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, "आम्हाला खाद्यतेलाची खूप कमतरता भासत होती. तेल मिळवणे खूप कठीण झाले असून बार चालवण्यासाठी काहीतरी जुगाड करण्याची गरज होती. म्हणून आम्ही हा भन्नाट मार्ग अवलंबला आहे. आतापर्यंत आम्हाला बिअरच्या बदल्यात ४०० लिटर सूर्यफूल तेल मिळाले आहे."
रशिया-युक्रेन युद्धाने ओढावलं भीषण संकट
मागील काही महिन्यांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध अद्याप सुरू असून, थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. या युद्धामुळे संपूर्ण जगाला इंधनाच्या भीषण संकटाला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय खाद्यतेलाच्या निर्यातीत युक्रेन आणि रशियाचा वाटा तब्बल ८० टक्के आहे. युरोपातील बहुतांश देश खाद्यतेलासाठी या दोन देशांवर अवलंबून असतात. अशा स्थितीत रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपीय देशांवर मोठं संकट ओढावलं आहे.