George W Bush: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची जीभ घसरली, इराकवर अमेरिकन हल्ल्याची केली निंदा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 05:40 PM2022-05-19T17:40:24+5:302022-05-19T17:40:50+5:30
Gorge W Bush: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनीच 2003 मध्ये इराकवर आक्रमण करण्याचे आदेश दिले होते.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना बुश यांनी रशियन हल्ल्याचा निषेध करताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे हुकूमशहा असे वर्णन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची तुलना ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्याशी केली. मात्र या कार्यक्रमादरम्यान त्यांची जीभ घसरली आणि चुकून त्यांनी युक्रेनऐवजी इराकचे नाव घेत इराकवरील हल्ल्याचा निषेध केला.
युक्रेनच्या अध्यक्षांचे कौतुक
बुश यांनी सदर्न मेथोडिस्ट युनिव्हर्सिटीच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हटले की, "देशात ज्याप्रकारे निवडणुका होतात, त्यावरुन देशातील नेते आपल्या लोकांशी आणि इतर देशांशी कसे वागतात, हे कळतं. युक्रेनकडे पाहून हे समजू शकता.'' यावेळी बुश यांनी व्होलोडिमिर झेलेन्स्की यांना "कूल लिटल मॅन" आणि "21 व्या शतकातील चर्चिल" म्हणून संबोधले. ते पुढे म्हणाले की, "झेलेन्स्कींना बहुसंख्य लोकांनी निवडले आहे, त्यांना रशियन आक्रमणाविरूद्ध आपल्या देशाचे रक्षण करण्याचे अधिकार मिळाले आहेत."
Former President George W. Bush: “The decision of one man to launch a wholly unjustified and brutal invasion of Iraq. I mean of Ukraine.” pic.twitter.com/UMwNMwMnmX
— Sahil Kapur (@sahilkapur) May 19, 2022
युक्रेनऐवजी इराकचा उच्चार
आपल्या 10 मिनिटांच्या भाषणादरम्यान बुश यांनी पुतीन यांच्यावर टीका केली. पुतिन यांनी रशियामधील जनतेच्या आक्रोशाला निर्दयपणे दडपले, राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकले. रशियामध्ये कोणताही चेक अँड बॅलन्स राहिलेला नाही.' यादरम्यान बोलताना बुश यांची जीभ घसरली आणि ते म्हणाले, ''एका व्यक्तीने इराकवर आक्रमण करण्याचा हा पूर्णपणे अन्यायकारक आणि क्रूर निर्णय आहे." लगेच त्यांना आपली चुक कळाली आणि "युक्रेनवर आक्रमण करण्याचा" असं म्हणाले.
प्रेक्षकांमध्ये हशा
त्यांचे वाक्य ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर बुश दबक्या आवाजात म्हणाले, 'इराकही.' बुश यांनी त्यांच्या घसरलेल्या जीभेला त्यांच्या वयाचा दोष म्हटले. विशेष म्हणजे, बुश यांनीच 2003 मध्ये इराकवर आक्रमण करण्याचे आदेश दिले होते. टीकाकार याला क्रूर आणि अन्यायकारक हल्ला म्हणतात. इराक युद्धात चार हजारांहून अधिक अमेरिकन सैनिक आणि 10 हजारांहून अधिक इराकी नागरिकही मारले गेले होते.