बर्लिन: डिझेल गाडीच्या इंजिनात बेकायदेशीर बदल करून पर्यावरणाला हानी पोहोचवल्याचा आरोप असणारे फोक्सवॅगनच्या ऑडी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रुपर्ट स्टॅडलर यांना सोमवारी जर्मनीत अटक करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी ऑडीच्या गाड्यांमधील उत्सर्जन नियंत्रण यंत्रणेत फेरफार करण्यात आल्याची बाब समोर आली होती. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्टॅडलर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे जर्मन तपासयंत्रणांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?साधारण तीन वर्षांपूर्वी 'डिझेलगेट' नावाचा हा घोटाळा उघडकीस आला होता. VW मॉडेलच्या गाड्यांमध्ये कंपनीने विशिष्ट उपकरण लावले होते. मोटारीतून निघणाऱ्या प्रदूषणकारी वायूंची मोजदाद होऊ नये यासाठी चलाखी केली होती. या कंपनीने असे सॉफ्टवेअर विकसित केले की मोटारीस प्रदूषण मोजमाप सुरू झाल्याचे कळत असे. या काळात मोटारीच्या इंजिनातून कोणतेही अतिरिक्त उत्सर्जन होत नसे. हे मोजमाप बंद झाल्यावर मात्र फोक्सवॅगनच्या मोटारीतून पुन्हा मोठ्या प्रमाणात उत्सर्जनला सुरुवात होत असे. अमेरिकी सरकारच्या पर्यावरणरक्षण विभागातील डॅनियल कार्डर या अभियंत्याने ही चलाखी उघड केली. त्याने या कंपनीच्या मोटारी पर्यावरणरक्षणाचे नियम पाळत नसल्याचे सप्रमाण सिद्ध केले. १५ ते ३५ पट जास्त विषारी वायूकार्डर व त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी फोक्सवॅगनच्या मोटारींचाच नव्हे तर इतर कंपन्यांच्या मोटारींचाही अभ्यास केला होता. त्यामध्ये फोक्सवॅगनच्या गाडय़ांमध्ये काहीतरी गडबड लक्षात आली. लॉस एंजालिस, वेस्ट कोस्ट ते सियाटल अशा अनेक ठिकाणी या वाहनांच्या चाचण्या झाल्या. त्यात या गाडय़ा १५ ते ३५ पट जास्त कार्बन व इतर वायू बाहेर टाकीत असल्याचे दिसून आले.