बर्लिन - हवेतील नायट्रोजन ऑक्साइडची मात्रा कमी करण्यासाठी जर्मनी सारकारनं सार्वजनिक वाहतूक सेवा मोफत करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. सिन्हुआ वृत्तसंस्थेनं रिपोर्टच्या हवाल्यानं सांगितले की, जर्मनीतील 20 शहरामध्ये नायट्रोजन ऑक्साइडची मात्रा युरोपियन महासंघाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा आधिक आहे. 2020 च्या आधी ही स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत.
युरोपियन महासंघाने ठरवलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या मर्यादेचे पालन करण्यात जर्मनी अपयशी ठरत आहे. लोक खाजगी वाहणांता वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे प्रदुषण वाढून हवा दुषित होत आहे. यावर उपाय म्हणून जर्मनी सरकारने सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोफत सार्वजनिक वाहतूकीबरोबरच कायद्यांमध्ये अनेक बदल करुन प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे जर्मन मंत्र्यांनी सांगितले. बस तसेच टॅक्सीमधून बाहेर येणाऱ्या धूरांबद्दल कठोर नियम करणे, वाहतूकीच्या नियमांमध्ये बदल करणे, वायू प्रदूषण मुक्त झोनची घोषणा करणे, कमी वायू प्रदूषण करणाऱ्या गाड्या वापरणाऱ्यांना कर सवलतींबरोबर सध्याच्या गाड्यांमधील तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासारख्या उपाययोजना राबवण्यासंदर्भातील नियोजन सुरु असल्याचेही जर्मनीने सांगितले आहे.
या संदर्भात पर्यावरण मंत्री बार्बरा हेन्ड्रीक्स, अर्थमंत्री पीटर अल्टमेरी आणि कृषीमंत्री ख्रिश्चन सीमीड यांनी मंत्र्यांनी युरोपीयन महासंघाचे पर्यावरण आयुक्त करमेन्यू वेल्ला यांना एक पत्र पाठवले आहे. वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे जर्मनीसमोरील सर्वात मोठे आव्हान असून त्या दृष्टीने आम्ही निर्णय घेण्यास सुरुवात केली असल्याचेही या या पत्रात म्हटले आहे.