जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. काही देशामध्ये कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी त्याचे साईड इफेक्ट्स देखील समोर आले आहेत. याच दरम्यान जर्मनीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लसीचा ओव्हरडोस दिल्यामुळे आठ जणांची प्रकृती बिघडली आहे. आठही जण आरोग्य कर्मचारी आहेत.
जर्मनीच्या स्ट्रेलसँड भागात रविवारी आरोग्य कर्मचाऱ्यांना फायजर-बायोएनटेकची लस देण्यात आली होती. मात्र लसीच्या डोसचे प्रमाण हे ठरवलेल्या प्रमाणापेक्षा पाचपट अधिक होते. त्यानंतर जवळपास चार जणांमध्ये फ्लूंची लक्षणे आढळून आली. तर काहींची तब्येत बिघडली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर प्रशासनाने माफी मागितली आहे. ही एक चूक असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. तसेच प्रमाणापेक्षा अधिक डोस दिल्यामुळे मोठे नुकसान होणार नसल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी जर्मनीमध्ये कोरोना लसीबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. काही भागांमध्ये लस स्वीकारण्यास नकार देण्यात आला. लस योग्य तापमानात ठेवण्यात आली नसल्याच्या कारणास्तव नकार देण्यात आला होता. अमेरिका, ब्रिटनमध्ये आतापर्यंत जवळपास 30 लाखांहून अधिकजणांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. लस तयार करण्यात येत असून काही ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे.
"कोरोनाच्या लसीमध्ये वापरण्यात आलं गायीचं रक्त"; हिंदू महासभेच्या नेत्याचा दावा
कोरोनाची लस येण्याआधीच यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. मुस्लीम संघटनांपाठोपाठ आता हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणि यांनी कोरोना लसीसंदर्भात सवाल उपस्थित केला आहे. स्वामी चक्रपाणि यांनी कोरोनाच्या लसीमध्ये गायीचं रक्त वापरण्यात आल्याचा दावा केला आहे. गायीचं रक्त असणारी कोरोना लस देशामध्ये वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्वामी चक्रपाणि यांनी केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना चक्रपाणि यांनी यासंदर्भात एक निवेदनही दिल्याची माहिती मिळत आहे. स्वामी चक्रपाणि यांनी केलेल्या निवेदनामध्ये जोपर्यंत कोरोनाची लस कशा पद्धतीने बनवण्यात आली आहे हे स्पष्टपणे सांगितलं जात नाही आणि ही लस एखाद्या व्यक्तीच्या धर्माविरोधात तर नाही हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत या लसीचा भारतात वापर केला जाऊ नये, असं म्हटलं आहे.