बर्लिन : कोरोनाचा कहर वाढत चालल्यामुळे ब्रिटननंतर आता जर्मनीमध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे.
या महिन्यापासून देशव्यापी लॉकडाऊनचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे चान्सलर अँजेला मर्केल यांनी सांगितले.
कोरोना संकटाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना जर्मनीत प्रथमच ३० डिसेंबर २०२० मध्ये एकाच दिवशी एक हजाराहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. जर्मनीच्या रोग नियंत्रण केंद्र असलेल्या रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहितीनुसार, एकाच दिवशी जर्मनीत १ हजार १२९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी एकाच दिवशी ९६२ जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे जर्मनीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३२ लाख १०७ झाली आहे.
पहिली लाट आली तेव्हा जर्मनीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर जर्मनीमधील मृत्यूदर वाढत गेला. जर्मनीसह प्रमुख युरोपीय देश असलेल्या इटली, ब्रिटन, फ्रान्स आणि स्पेन यांमध्येही कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
१६ डिसेंबर २०२० पासून शाळा, दुकाने तसेच व्यापारी आस्थापने बंद करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आता या महिन्याच्या अखेरीपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्येही देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी केली होती.