देव तारी त्याला कोण मारी....ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अशा अनेक आश्चर्यकारक घटना नेहमीच समोर येत असतात ज्यात लोक मृत्यूच्या दारातून परत आलेले असतात. अशीच एक घटना 22 वर्षीय एका तरूणीसोबत घडली. उंच डोंगरावरून खाली पडूनही तिचा जीव वाचला. हेलिकॉप्टरच्या मदतीने तिला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. पण या घटनेत तरूणीच्या एका मैत्रीणीचा जीव गेला. या तरूणींना धक्का देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पुढील चौकशी केली जात असून या घटनेबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना जर्मनीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ Neuschwanstein Castle इथे घडली. इथे 22 वर्षीय केल्सी चांग आणि 21 वर्षीय एवा लुई फिरायला आल्या होत्या. यावेळी सोबतच चालत असलेल्या एका व्यक्तीसोबत त्यांचा वाद झाला. वाद इतका वाढला की, त्या व्यक्तीने एवाचा गळा दाबायला सुरूवात केली. अशात केल्सीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने दोघींनाही डोंगराहून खाली धक्का दिला.
डोंगराहून शेकडो फूट खाली पडल्याने यात एवाचा मृत्यू झाला. मात्र, केल्सी नशीबवान ठरली. कारण खाली पडत असताना ती एका झाडाला लटकली होती. केल्सी 165 फुटावर हवेत लटकून होती. नंतर हेलिकॉप्टरच्या मदतीने तिला वाचवण्यात आलं.
पोलीस म्हणाले की, एका व्यक्तीने एवावर हल्ला केला आणि जेव्हा केल्सीने हस्तक्षेप केला तर दोघींनाही त्याने डोंगराहून धक्का दिला. केल्सीने आपला जीव वाचवण्यासाठी एका झाडाला पकडलं, तिची मैत्रीण एवाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
केल्सीच्या रेस्क्यूचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात बचाव दलाचे लोक तिला हेलिकॉप्टरने वाचवताना दिसत आहेत. मेट्रोच्या रिपोर्टनुसार, घटनेनंतर आरोपी पळून गेला. नंतर त्याला पकडण्यात आलं. गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेबाबत केल्सी आणि एवाच्या यूनिवर्सिटीने दु:खं व्यक्त केलं. दोघींनी सोबतच पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं.