जर्मनीच्या नौदलाचे प्रमुख (German Navy Chief) यांना भारत दौऱ्याहून मायदेशी परतल्यानंतर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. युक्रेन आणि रशिया संबंधी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेला सामोरं जावं लागल्याचा फटका जर्मनीच्या नौदल प्रमुखांना बसला आहे. नौदलाचे व्हाइस अॅडमिरल अकिम शोएनबॅक (Ekim Sconbach) यांनी भारतात आयोजित एका कार्यक्रमात रशियानं २०१४ साली ज्या क्रिमिया खंडावर कब्जा केला होता. तो युक्रेनला परत मिळेल असं वाटत नाही, असं म्हटलं होतं. तसंच रशियाला चीनविरोधात एका भूमिकेवर ठाम राहावं लागेल, असंही ते म्हणाले होते. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) सन्मानास पात्र आहेत, असंही ते म्हणाले होते.
शोएनबॅक यांच्या या विधानांमुळे युक्रेनचा जळफळाट झाला आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी जर्मनीच्या राजदूतांशी संपर्क साधला. शोएनबॅक यांना बर्लिनमध्येही टीकांना सामोरं जावं लागलं. अखेर शोएनबॅक यांनी शनिवारी रात्री उशिरा आपल्या पदाचा राजीनामा दिला. "कोणताही विचार न करता मी केलेल्या विधानांमुळे जर्मनी आणि देशाच्या सैन्याचं आणखी नुकसान होऊ नये यासाठी राजीनामा देत आहे", असं शोएनबॅक यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटलं आहे. जर्मनीचे संरक्षण मंत्री ख्रिस्टीन लॅम्ब्रेक्ट यांनीही शोएनबॅक यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं म्हटलं आहे. तसंच शोएनबॅक यांच्या राजीनाम्यानंतर नौदलाच्या उप-प्रमुखांकडे सध्या सैन्याचं प्रमुखपद सोपवण्यात आल्याचं सांगितलं आहे.
जर्मन सरकारनं दाखवली एकीयुक्रेनच्या बाबतीत रशियन सैन्याच्या धोक्याच्या मुद्द्यावर उत्तर अटलांटीक संधी संघटनेच्या (नाटो) सदस्यांसोबत एकजुटीनं जर्मनी देखील भक्कम उभा असल्याचं जर्मन सरकारनं म्हटलं आहे. रशियानं युक्रेनमध्ये कोणत्याही पद्धतीची सैन्य कारवाई केली तर त्याची मोठी किंमत रशियाला चुकवावी लागेल, असंही जर्मनीनं म्हटलं आहे.