युक्रेनच्या युद्धकाळात जर्मनीची रशियाकडून सर्वाधिक इंधन खरेदी; भारताबाबत दुटप्पी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 07:29 AM2022-04-29T07:29:10+5:302022-04-29T07:29:28+5:30
सीआरईसीएच्या अभ्यासातील निष्कर्ष, २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनचे युद्ध सुरू झाले. तेव्हापासून दोन महिन्यांत जर्मनीने रशियाकडून सर्वाधिक तेल व नैसर्गिक वायू खरेदी केला आहे.
बर्लिन : युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतरच्या दोन महिन्यांत जर्मनीने रशियाकडून सर्वाधिक इंधन तेल व नैसर्गिक वायूची खरेदी केली आहे. हा व्यवहार ५ हजार अब्ज रुपयांचा आहे. यासंदर्भात सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (सीआरइसीए) या संस्थेने केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला. युक्रेन युद्धात त्या देशाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारा जर्मनी आपले स्वहित जपण्याकरिता रशियाशी थेट वैर घेण्यास तयार नाही.
२४ फेब्रुवारी रोजी युक्रेनचे युद्ध सुरू झाले. तेव्हापासून दोन महिन्यांत जर्मनीने रशियाकडून सर्वाधिक तेल व नैसर्गिक वायू खरेदी केला आहे. रशियाहून इंधन तेल घेऊन जर्मनीला रवाना झालेली जहाजे तसेच नैसर्गिक वायूचा पाइपलाइनद्वारे होणारा पुरवठा यांचा एकत्र हिशोब सीआरईसीए या संस्थेच्या अहवालात मांडण्यात आला आहे. जर्मनीने गेल्या वर्षी ८ हजार अब्ज रुपयांची इंधन व नैसर्गिक वायू, कोळशाची खरेदी केली. त्या रकमेतील एक चतुर्थांश भाग रशियाला देण्यात आला. उर्जास्रोतांच्या बाबत रशियावर इतके अवलंबून राहिल्यामुळे एक दिवस जर्मनी व युुरोपची सुरक्षा संकटात येऊ शकेल, असा इशारा अनेक देशांनी याआधीच दिला होता.
भारताबाबत दुटप्पी भूमिका
युरोप एकाच वेळेस रशियाकडून जेवढे तेल खरेदी करतो, तेवढे तेल भारत त्या देशाकडून महिनाभरात खरेदी करतो, असे केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते. युक्रेन युद्धाच्या काळातही रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर काही देशांनी टीका केली होती. मात्र, आता जर्मनीच्या दुटप्पी भूमिकेवर कितीजण ताशेरे ओढतात, याकडे भारतासह अनेक देशांचे लक्ष लागले आहे.