कराची: पाकिस्तानात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नेते मंडळी दारोदारी जाऊन उमेदवारांच्या भेटीगाठी घेत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध मार्गांचा वापर करत आहेत. एका अपक्ष उमेदवारानं मतदारांना साद घालण्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला आहे. हा उमेदवार सांडपाण्यात लोळून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत आहे. सध्या या उमेदवाराचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे.पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. कराचीच्या एन-243 मतदारसंघातून अयाज मेमॉन मोतीवाला अपक्ष निवडणूक लढवत आहेत. आपण मतदारसंघातील लोकांच्या समस्या उत्तमपणे जाणतो, हे दाखवण्यासाठी ते चक्क चिखलात लोळत आहेत. एन-243 मतदारसंघात सांडपाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे. सांडपाण्याच्या या समस्येची आपल्याला अगदी उत्तम जाणीव आहे, हे मतदारांना समजावं, यासाठी मोतीवाला चिखलात लोळत आहेत. मतदारसंघातील जनता सांडपाण्याच्या समस्येनं त्रस्त असताना सरकार आणि विरोधकांना याची जाणीव नाही, असा आरोप मोतीवाला यांनी केला आहे. मोतीवाला यांच्या या अनोख्या प्रचाराची सध्या पाकिस्तानात मोठी चर्चा आहे. चिखलात लोळणाऱ्या मोतीवाला यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोतीवाला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनही जनतेशी संवाद साधत आहेत.
मतांसाठी कायपण; प्रचारादरम्यान 'तो' उमेदवार चक्क चिखलात लोळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 3:12 PM