ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. २९ - नेपाळमधील भूकंपामुळे हजारो जीव मृत्यूमुखी पडलेले असतानाच एका तरूणाच्या बाबतीत मात्र ' काळ आला होता पण वेळ आली नव्हती' अशी घटना घडली आहे. भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या इमारतीच्या ढिगा-याखाली अडकलेल्या ऋषी खनाल या २८ वर्षीय तरूणाला बचावपथकाने तीन दिवसांनतर ढिगा-याखालून जिवंतपणे बाहेर काढल्याने त्याला जीवदान मिळाले आहे.
शनिवारी आलेल्या शक्तिशाली भूकंपानंतर नेपाळ अक्षरश: उध्वस्त झाले, हजारो लोक मृत्यूमुखी पडले तर कित्येक जण जखमी झाले. बचावपथकातील अधिकारी जखमींचा शोध घेत असतानाच काठमांडू येथील गोगंबू भागात एका सातमजली इमारतीच्या ढिगा-याखाली तरूण अडकल्याची माहिती मिळाली. बचाव पथकाच्या अधिका-यांवी अथक परिश्रम करत तब्बल तीन दिवसांनी ऋषीला ढिगा-याखालून जिवंत बाहेर काढले. तीन दिवस तो अन्नपाण्यावाचून ढिगा-याखाली पडलेला होता, त्याच्या आजूबाजूला असलेल्या मृतदेहांचा दुर्गंध सहन करत असतानाही आपल्याला वाचवायला कोणीतरी येईल, या एकाच दुर्दम्य आशेवर तो जिवंत राहिला. दैव बलवत्तर असल्याने या दुर्दैवी घटनेतून वाचलेल्या ऋषीच्या पायाचे हाड मोडले असून त्याच्यावर सध्या रुग्णालयातउपचार सुरू आहेत.
नेपाळमधील भूकंपाला पाच दिवस उलटले असून या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा ५ हजारांच्यावर पोचला आहे.