पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदी सध्या वॉशिंग्टन डीसीमध्ये असून, तिथे पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. एअरपोर्टवरही त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मोदींनी एका कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच नंतर ते खासगी डिनरसाठी व्हाईट हाऊस येथे पोहोचले. तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी यांनी त्यांचं स्वागत केलं.
या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना काही खास भेटवस्तू दिल्या. मोदी यांनी बायडन यांना दिलेल्या भेटवस्तूंचा थेट संबंध बायडेन यांच्या वयाशी आहे. पंतप्रधान मोदी यांनी बायडन यांना सहस्रचंद्र दर्शनासाठीच्या भेटवस्तू दिल्या आहेत. सहस्रचंद्र दर्शनावेळी गणेश पूजेची परंपरा आहे. त्यासाठी मोदींनी बायडेन यांना गणेशमूर्ती आणि एक दिवाही भेट दिला.
मोदींनी बायडन यांना दिलेल्या भेटवस्तूंमध्ये पंजाबमधील तूप, राजस्थानमधील हाताने बनवलेला २४ कॅरेट हॉलमार्क असलेलं सोन्याचं नाणं, ९९.५ कॅरेट चांदीचं नाणं. महाराष्ट्रातील गुळ, उत्तराखंडमधील तांदूळ, तामिळनाडूतील तीळ, कर्नाटकमधील म्हैसूर चंदनाचा तुकडा, पश्चिम बंगालमधील कारागिरांनी तयार केलेला चांदीचा नारळ, गुजरातमधील मीठ, श्री गणेशाची मूर्ती आणि दिवा अशा भेटवस्तू दिल्या.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन आणि फर्स्ट लेडी यांचे आभार मानले. जो बायडन आणि जिल बायडन यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिलेल्या मेजवानीसाठी त्यांचे आभार. आमच्यामध्ये विविध विषयांवर चांगली बातचित झाली, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जो बायडन यांनी व्हाइट हाऊसमधील फॅमिली डिनरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी गुजराती गरबाचं आयोजन केलं होतं.