अमेरिकेच्या जवळपास ८५ हजार सरकारी कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ दिल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांची लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची तयारी डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. यामुळे फेडरल कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सरकारच्या गोपनिय फाईल्स लीक होऊ नयेत किंवा केल्या असतील या संशयातून ट्रम्प सरकार या लाखो कर्मचाऱ्यांची लाय डिटेक्टर टेस्ट करणार आहे. अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने याची घोषणा केली आहे. सरकारी गोपनिय कागदपत्रे लीक होण्यापासून वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
गृहमंत्री क्रिस्टी नोएम यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत ही पॉलिग्राफ चाचणी द्यावी लागणार आहे. याचबरोबर गृह मंत्रालयाच्या सहाय्यक सचिव ट्रिसिया मॅकलॉघलिन यांनी गृह सुरक्षा विभाग ही राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक संस्था आहे. आपण सर्व कर्मचाऱ्यांवर पॉलीग्राफ चाचण्या करू शकतो, केल्या पाहिजेत आणि भविष्यातही करू, असे म्हटले आहे.
आता या गोष्टीमुळे उर्वरित अनेक कर्मचारी देखील नोकरीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचारी म्हणून कुठे ना कुठेतरी त्यांनी ही चूक केलेली असण्याची शक्यता असते. यामुळे लाय डिटेक्टर चाचणीत दोषी आढळले तर पुढे समस्या येऊ शकते. यामुळे हे कर्मचारी भितीच्या छायेखाली आहेत.
कशी असते पॉलिग्राफ चाचणी...
पॉलिग्राफ चाचणीमध्ये ही एखादी व्यक्ती खोटे बोलत आहे की खरे बोलत आहे हे पाहिले जाते. एखादी व्यक्ती खोटे बोलत असेल तर त्याच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब बदलतो. या चाचणीत प्रश्न विचारले जातात. ही चाचणी बहुतांशवेळा त्या व्यक्तीच्या संमतीनंतरच घेतली जाते. खोटे बोलत असताना घाम येतो. तसेच हाता पायाच्या हालचाली बदलतात. याकडेही लक्ष दिले जाते.