डलास : पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान गिळंकृत केले आहे. या भूभागातून पाकिस्तान हटल्यास काश्मीर प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अमेरिकेतील एका संस्थेने म्हटले आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध रोष वाढू लागला आहे. हा भूप्रदेश व्यापक काश्मीरचा भाग समजला जातो, सध्या तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे. वॉशिंग्टन येथील गिलगिट-बाल्टिस्तान नॅशनल काँग्रेसचे संचालक सेंगे सेरिंग यांनी एका निवेदनात हे वक्तव्य केले आहे. सेरिंग यांनी म्हटले की, गिलगिट-बाल्टिस्तानमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा मुद्दा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे. हे एक चांगले पाऊल आहे. गिलगिट-बाल्टिस्तान हा प्रदेश पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवला असल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एक ठराव मंजूर करून जाहीर केलेले आहे. पाकिस्तानचे सर्व शेजारी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला या बाबीची आठवण करून द्यायला हवी. तुम्ही गिलगिट-बाल्टिस्तानात घुसखोर आहात. तुम्ही तिथून बाहेर पडल्यास काश्मीर प्रश्नाची सोडवणूक गतिमान होईल, असे पाकला ठणकावून सांगायला हवे. सेरिंग यांनी म्हटले की, गिलगिट-बाल्टिस्तान हा वादग्रस्त भूभाग आहे. त्यामुळे येथील नागरिकांना संयुक्त राष्ट्रे, श्रीनगरमधील काश्मीर सरकार आणि नवी दिल्लीतील भारत सरकार यांच्याशी थेट चर्चा करण्याचा अधिकार असायला हवा. पाकिस्तानकडून भारतीय काश्मिरात अतिरेकी कारवायांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. दहशतवाद हा पाकिस्तान सरकारच्या राजकीय धोरणाचा भाग झाला आहे. या पार्श्वभूमीवर गिलगिट-बाल्टिस्तानमधून उठत असलेल्या पाकविरोधी असंतोष महत्त्वाचा ठरतो. हा भूभाग पाकिस्तानपासून वेगळा करण्याची मागणी येथील नागरिक करू लागले आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान नॅशनल काँग्रेस त्यासाठीच काम करते. (वृत्तसंस्था)
‘गिलगिट-बाल्टिस्तान पाकने सोडून द्यावे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2016 2:13 AM