ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 15 - पाकव्याप्त काश्मीरचा एक भाग असलेल्या गिलगिट बाल्टिस्थानला पाचवा प्रांत पाकिस्तानचा पाचवा प्रांत म्हणून दर्जा देण्याचा घाट पाकिस्तान सरकारने घातला आहे. त्यामुळे काश्मीर प्रश्नावरून भारत आणि पाकिस्तानमधील मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचे आंतर प्रांतीय समन्वय मंत्री रियाझ हुसेन पिरझादा यांनी जियो टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली आहे. "पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सरतार अझीझ यांच्या नेतृत्वाखालील समितीने गिलगिट-बाल्टिस्थानला पाकिस्तानचा प्रांत म्हणून दर्जा देण्याचा प्रस्ताव दिला आहे,'' असे पिरझादा यांनी सांगितले. सध्या पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि पंजाब असे चार प्रांत आहेत. आता गिलगिट बाल्टिस्थानला पाचव्या प्रांताचा दर्जा देऊन त्यावर आपला हक्क सांगण्याचा पाकचा डाव आहे.
"सांवैधानिक तरतुदीमुळे या प्रांताच्या दर्जात बदल होईल. पाकिस्तान आणि चीनमधील आर्थिक क्षेत्राला जोडणारा गिलगिट-बाल्टिस्थान हा महत्त्वाचा भाग आहे." अशी माहिती पिरझादा जांनी दिली. सध्या पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्थानला वेगळा दर्जा दिलेला असून, या भागाची स्वत:ची विधानसभा आणि मुख्यमंत्री आहे.
गिलगिट बाल्टिस्थानला सध्या पाकिस्तानकडून कुठलाही कायदेशीर दर्जा प्राप्त झालेला नसल्याने या चीन चिंतीत आहे. त्यामुळे चीनची चिंता दूर करण्यासाठी आणि पाकिस्तान आणि चीनमध्यील महत्त्वाकांक्षी चीन पाकिस्तान आर्थिक क्षेत्राला कायदेशीर आधार देण्यासाठी पाकिस्तानने या भागाला आपल्या देशाचा पाचवा प्रांत घोषित करण्याचा डाव आखला आहे. गेल्या वर्षी उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला आहे. आता पाकिस्तानच्या या आगळीकीमुळे तणाव अधिकच चिधळण्याची शक्यता आहे.