गाझा येथील एका तरुणीने तिच्या घरातून एक व्हिडीओ बनवून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये बॉम्बस्फोटांचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहेत. जे खूप भीतीदायक वाटतं. हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा फटका पॅलेस्टाईनच्या सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.
पॅलेस्टिनी पत्रकार प्लेस्तिया अलकदने तिच्या घरात एक व्हिडीओ बनवला आहे. तिने बाल्कनीतून बाहेरचं दृश्य दाखवलं आहे. सर्वत्र फक्त धूर दिसत आहे. अलकदने आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांच्या जीवनावर कसा परिणाम होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
सोमवारी अलकदने तिच्या फ्लॅटमधून हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला. ती म्हणते की, हल्ला टाळण्यासाठी तिचे शेजारी 'खिडकीपासून दूर' तिच्या अपार्टमेंटच्या एका भागात लपले. मी गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण मला वाटते की तुम्ही हे सर्व ऐकू शकता.
ती पुढे म्हणते, आम्ही सध्या घरात आहोत आणि श्वास घेता येत नाही. आठ तासांनंतर अपडेट देताना ती म्हणाली की येथे वीज नाही आणि इंटरनेट नाही. एक बॉम्ब तिच्या घरावर पडला. कॅमेरा ती खिडकीकडे वळवत तिने समोरच्या इमारतीवर कसा हल्ला झाला हे दाखवले. लोक रस्त्यावर एम्ब्युलन्सची मागणी करत आहेत पण तिथे एम्ब्युलन्स नाही. रिकाम्या रस्त्यावर ओरडण्याचा आवाज येत होता.
संध्याकाळी 7 वाजता, प्लेस्तियाने सोशल मीडियावर सांगितलं की, ती आपल्या कुटुंबासह शेजाऱ्यांच्या घरी आहे. प्रत्येकजण अंधारात आहे. जगात काय चालले आहे हे कोणालाच कळत नाही. फक्त बॉम्ब पडल्याचा आवाज ऐकू येतो. कुणाला काही कळत नाही. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलकडून गाझावर प्रत्युत्तराचे हल्ले सुरूच आहेत.