दिल्ली : देव तारी त्याला कोण मारी अशी मराठीत म्हण आहे. मात्र याच म्हणीचा प्रत्यय शनिवारी रात्री राजधानी दिल्ली येथे आला आहे. दिल्लीतील प्रसिद्ध एम्स रुग्णालयाला शनिवारी रात्री अचानक लागलेल्या आगीतही एका बालिकेचा सुखरूप जन्म झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या विषयीचे ट्विट केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री उशिरा एम्समध्ये आग लागल्याचे वृत्त हाती आले. रुग्णालायाचा पहिला आणि दुसरा मजला आगीच्या भक्ष्यस्थानी होता. अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझविण्याचं काम सुरु आहे. दरम्यानच्या काळात रुग्ण सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरु केले असताना एका महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या. आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची डिलिव्हरी केली. त्यांना मुलगी झाली आहे. दरम्यान या मुलीच्या जन्माच्यावेळी बाहेर आग धुमसत असल्याने अग्निशमन दलाचे कुलिंग ऑपरेशन सुरूच होते.
याच रुग्णालयात भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावर उपचार सुरु आहेत. सुदैवाने त्यांच्यावर उपचार सुरु असलेल्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा पोहचू शकल्या नाहीत. या घटनेमागे शॉर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.