रशियामध्ये गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या करणारा जन्मठेपेचा आरोपी युक्रेनविरोधात युध्द लढला म्हणून त्याची शिक्षा माफ करण्यात आली आहे. त्याने तिच्या प्रेयसीला १११ वेळा चाकू मारला होता. या हत्येप्रकरणी त्याला दोषी ठरविण्यात आले होते. परंतू, युद्धावेळी रशियाला सैनिकांची गरज लागल्याने 'कन्विक्ट रिक्रूटमेंट' पॉलिसी राबविण्यात आली. याद्वारे त्याला सैन्यात भरती करण्यात आले व त्याला दोषमुक्तही करण्यात आले.
व्लादिस्लाव कान्युस (27) असे या आरोपीचे नाव आहे. द सनच्या रिपोर्टनुसार कान्युस याने त्याची २३ वर्षीय प्रेयसी वेरा पेक्टेलेवा हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली होती. यामुळे त्याला न्यायालयाने १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतू, त्याने एक वर्षापेक्षाही कमी शिक्षा भोगली आहे.
वेराने त्याच्याशी ब्रेकअप केले होते. यामुळे रागातून त्याने तिला गाठून बलात्कार केला व नंतर तिच्यावर १११ वेळा चाकूचे वार करून हत्या केली. त्याने तिच्यावर तीन तास अत्याचार केले होते. एवढ्यावरच तो थांबला नाही तर ती जिवंत असल्याचे पाहून त्याने व्हेराची लोखंडी केबलने गळा आवळून हत्या केली.
कान्यूस याच्या या सुटकेवर वेराच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. मुलीच्या मारेकऱ्याला तुरुंगातून मुक्तता मिळणे हे आपल्यासाठी धक्कादायक असल्याचे तिने म्हटले आहे. मी जिवंत नाही, फक्त माझे अस्तित्व दिसते. माझ्या मुलीच्या मारेकऱ्याच्या निर्दोष सुटकेने मला उद्ध्वस्त केले आहे. मी खूप मजबूत स्त्री आहे. पण आपल्या देशातील या अराजकतेने मला खूप दुखावले आहे. निर्दयी मारेकऱ्याला शस्त्रे कशी दिली जाऊ शकतात? रशियाच्या संरक्षणासाठी त्याला युद्ध आघाडीवर का पाठवले गेले? तो माणूस नसून तो एक सैतान आहे. माझ्या जीवालाही त्याच्यापासून धोका आहे, असे तिने म्हटले आहे.