नवी दिल्ली: भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालिका ख्रिस्टिन लगार्डी यांनी गोपीनाथ यांची नियुक्ती केली आहे. सध्या मोरी ऑब्स्टफेल्ड यांच्याकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची जबाबदारी आहे. ते डिसेंबरमध्ये निवृत्त होतील. त्यानंतर या पदाची धुरा गीता गोपीनाथ यांच्याकडे असेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी नियुक्ती झालेल्या गीता गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत. याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची या पदावर नियुक्ती झाली होती. राजन 1 सप्टेंबर 2003 ते 1 जानेवारी 2007 या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधाच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी होते. मोरी ऑब्स्टफेल्ड सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधाचे मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून काम पाहतात. ते डिसेंबरमध्ये निवृत्त होतील. त्यानंतर गीता गोपीनाथ यांच्याकडे या पदाची जबाबदारी असेल. त्या सध्या हॉवर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था या विषयाच्या प्राध्यापिका आहेत. गोपीनाथ अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूच्या सहसंपादक आहेत. याशिवाय त्या राष्ट्रीय आर्थिक संशोधन संस्थेच्या सहसंचालिकादेखील आहेत. त्यांच्याकडे अमेरिकचं नागरिकत्व असून 2001 मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे. गीता गोपीनाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून बीए केलं आहे. दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि वॉशिंग्टन विद्यापीठातून त्यांनी एमए केलं आहे.
भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 9:06 PM