काय सांगता... तेलाची बाटली द्या, बिअरची बाटली घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 10:51 AM2022-07-28T10:51:52+5:302022-07-28T10:52:33+5:30

युरोपात सध्या खाद्यतेलाची टंचाई सुरू आहे. त्यातही सूर्यफुलाच्या तेलाची.

Give a bottle of oil, take a bottle of beer! | काय सांगता... तेलाची बाटली द्या, बिअरची बाटली घ्या!

काय सांगता... तेलाची बाटली द्या, बिअरची बाटली घ्या!

googlenewsNext

रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे केवळ त्या दोन देशांमधील असलं तरी त्याचे परिणाम, पडसाद आणि झळा साऱ्या जगाला बसल्या. अर्थात आजच्या काळात संपूर्ण जगच एकमेकांवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असताना कोणतंही युद्ध हे फक्त त्या दोन देशांपुरतं कधीच राहत नाही. या युद्धातही साऱ्या जगानं याचा अनुभव घेतला. युद्धाचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे अनेक देशांत खाद्यतेल प्रचंड महाग झालं, खाद्यतेलाचा तुटवडा तिथे भासू लागला. इतका की, अनेक हॉटेल व्यावसायिकांना आपले व्यवसाय तात्पुरते का होईना, बंदच करावे लागले; कारण खाद्यतेलच नाही, तर पदार्थ बनवणार कसे? घरगुती पातळीवरही खाद्यतेलाची टंचाई लोकांना जाणवलीच; पण त्यांना चढ्या दरानं का होईना, आपल्या स्वयंपाकघराची गरज भागेल एवढं खाद्यतेल मिळतंय; पण हॉटेल व्यावसायिकांना ज्या प्रमाणात आणि जितकं खाद्यतेल लागतं, तितक्या तेलाचा पुरवठा त्यांना होणं शक्यच नाही. 

युरोपात सध्या खाद्यतेलाची टंचाई सुरू आहे. त्यातही सूर्यफुलाच्या तेलाची. युरोपात खाण्यासाठी इतर कोणत्याही तेलापेक्षा सूर्यफुलाच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रशिया-युक्रेन युद्धच या खाद्यतेलाच्या टंचाईलाही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. कारण संपूर्ण जगात हे दोन देशच सूर्यफुलाच्या तेलाचे सर्वांत मोठे उत्पादक आहेत. युद्ध सुरू असल्यामुळे या तेलाची निर्मिती, उत्पादन आणि वितरण या सर्वच गोष्टींवर अनेक बंधने आली आहेत. अनेकजण खाद्यतेलाच्या या टंचाईवर उपाय शोधत आहेत. जर्मनीच्या एका पबनं मात्र यावर इतका अनोखा उपाय शोधला, की अक्षरश: काही दिवसांत त्यांच्याकडच्या खाद्यतेलाची टंचाई संपली आणि त्यांच्याकडे तेलाचा पुरेसा साठा निर्माण झाला. आपलं किचन बंद करण्याची त्यांच्यावरची वेळही टळली.

असं केलं तरी काय या पबनं? 

या पबनं लोकांना जाहीर आवाहन केलं, तुम्हाला बिअर पाहिजे असेल, तर आमच्याकडे या. जितकी पाहिजे तितकी बिअर घ्या. त्यासाठी एक छदामही मोजू नका. एक गोष्ट फक्त करा, सूर्यफुलाच्या तेलाच्या बाटल्या आम्हाला द्या. तुम्ही एक लीटर तेलाची बाटली आम्हाला दिली, तर एक लीटर बिअरची बाटली आमच्याकडून तुम्हाला ‘फुकट’ मिळेल! ‘जिसिंजर ब्रेवरी’ असं या पबचं नाव आहे. त्यांच्या या ऑफरला लोकांनी भरभरून दाद दिली. लोकांनी आपल्या जिभेला जरा लगाम लावला; पण स्वयंपाकघरातलं तेल आपापल्या बाटल्यांत भरून ते या पबकडे पोहोचले. पबनंही त्यांना या तेलाच्या बदल्यात बिअरच्या बाटल्या पुरवल्या. दोघांसाठीही हा फायद्याचा सौदा होता; कारण पबला तेल मिळणं मुश्कील झालं होतं, तर लोकांच्या दृष्टीनं हा खरोखरच फायद्याचा सौदा होता; कारण सूर्यफुलाच्या खाद्यतेलाची एक लीटरची बाटली त्यांना साडेचार युरोमध्ये पडत होती, तर एक लीटर बिअरसाठी त्यांना सात ते आठ युरो मोजावे लागत होते. दुसऱ्या अर्थानं विचार केला तर साडेचार युरोच्या बदल्यात त्यांना आठ युरो मिळत होते! अनेकांसाठी हा ‘जॅकपॉट’च होता. त्यामुळे लोकांनी आपल्याकडच्या खाद्यतेलावर पाणी सोडायची तयारी दाखवताना, त्या बदल्यात बिअरच्या बाटल्या घेण्याला पसंती दिली. 
जर्मनीतील एक ‘सामाजिक कार्यकर्ता’ आणि बिअरप्रेमी तर फारच अफलातून निघाला. त्यानं जी शक्कल लढवली, त्यानं तर अनेकांच्या मेंदूला मुंग्या आल्या. हा कार्यकर्ता रशिया आणि युक्रेन युद्धामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी युक्रेनमध्ये गेला होता. तिथल्या लोकांना त्यानं आपल्याकडून शक्य ती मदत केली; पण युक्रेनहून परत येताना मात्र तो ऐंशी लीटर सूर्यफुलाचं तेल घेऊन आला. हे खाद्यतेल त्यानं या पबला नेऊन दिलं आणि त्याबदल्यात बिअरच्या बाटल्या मिळवल्या. मोरिझ बॉलर असं या ‘हिकमती’ माणसाचं नाव आहे. याच बाटल्यांच्या माध्यमातून त्यानं आपला वाढदिवस जंगी साजरा केला आणि आपल्या मित्रमंडळींना खुश  करून टाकलं! 

८० टक्के तेलाचा पुरवठा! 
रशिया आणि युक्रेनमध्ये किती प्रमाणात खाद्यतेल 
निर्माण होत असावं? एका अंदाजानुसार, युद्ध सुरू होण्यापूर्वी जवळपास ८० टक्के खाद्यतेलाचा पुरवठा या दोन देशांमधूनच जगाला केला जात होता; पण युद्ध सुरू होताच तेलाच्या पुरवठ्यावर गंडांतर आलं. हे तेल युरोपात पोहोचणं मुश्कील झालं आणि लोकांच्या स्वयंपाकघरातलं तेल आटू लागलं.

Web Title: Give a bottle of oil, take a bottle of beer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.