सेऊल: उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए- इन यांची गेल्या आठवड्यात भेट झाली. प्रदीर्घ काळानंतर दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा सुरु झाल्याने जागतिक राजकारणात हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. या दोन्ही देशांना शांततेसाठी बोलणी करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचे नोबेल द्यावं, अशी मागणी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून यांनी केलीय. गेल्या आठवड्यातील चर्चेत दोन्ही देशांनी संपूर्ण कोरिया अण्वस्त्ररहित करण्याच्या विचारावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झालं.आम्हाला फक्त शांतता हवी आहे. (त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या) ट्रम्प यांना नोबेल द्यायला हवं, असं मून आपल्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत म्हणाल्याचं ब्लू हाऊसच्या अधिकृत अधिकाऱ्यानं सांगितलं. ट्रम्प यांच्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असणारे बराक ओबामा यांनाही शांततेचं नोबेल मिळालं होतं.आता ट्रम्प स्वत: किम जोंग उन यांना भेटणार आहेत. साधारणत: तीन ते चार आठवड्यांनी त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. २०१७ हे वर्ष उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचण्या आणि किम-ट्रम्प यांची एकमेकांना दिलेली प्रत्युत्तरे यामुळे गाजले होते. या परिस्थितीमुळे जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची स्थिती निर्माण झाली होती. सुदैवानं हा तणाव निवळला असून पुढील प्रश्न चर्चेनं सोडवण्यावर एकमत झालंय.
''डोनाल्ड ट्रम्पना शांततेचं नोबेल द्या''
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 8:55 AM