न्यू यॉर्क : कॉर्पोरेट करांमध्ये मोठी कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय भारताने घेतला आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी जागतिक स्तरावरील उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.ब्लूमबर्ग ग्लोबल बिझनेस फोरममधील भाषणात ते म्हणाले, भारतात उद्योगांना अधिक अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. उद्योजकांना गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी भारतात यावे. तुम्हाला स्टार्ट अप कंपन्या सुरू करायच्या असतील तर त्यासाठी आमची मोठी बाजारपेठ तुम्हाला खुणावते आहे.३५ टक्के असलेल्या कॉर्पोरेट करांत कपात करून मोदी सरकारने ते प्रमाण २५.१७ टक्क्यांवर आणले. हे प्रमाण जगातील प्रमुख देशांमध्ये असलेल्या कॉर्पोरेट करांइतकेच आहे. मोदी पुढे म्हणाले, भारतातील शहरांचे झपाट्याने आधुनिकीकरण होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व अनेक सुविधांनी ही शहरे सुसज्ज होत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरील उद्योजकांनी या शहरांतील नागरी प्रकल्पांमध्येही गुंतवणूक करायला हवी. भारताच्या संरक्षण क्षेत्रातही परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. उत्तम रीतीने व्यवसाय करता यावा म्हणून ५० कायदे रद्दबातल करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)अजून मोठा पल्ला गाठायचा आहे!भारतातील वातावरण उद्योगांना अनुकूल करण्यासाठी आम्ही अतिशय मोठे निर्णय घेत आहोत. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. २०२४-२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनची करण्याचे ध्येय आम्ही बाळगले आहे. लोकशाही राजवट, राजकीय स्थैर्य, ठोस धोरणे, निष्पक्ष न्यायव्यवस्था हे भारतातील वातावरण गुंतवणुकीसाठी आश्वासक आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
सुवर्णसंधीचा लाभ घेऊन जागतिक उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करावी-मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 1:41 AM