New Parliament Inauguration: २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. देशभरातील १९ पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. असे असले तरी भव्य सोहळ्यात नवीन संसद भवनाचे लोकार्पण करण्यात आले. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. एकीकडे देशातील विरोधक टीका करताना दिसत असले, तरी आता थेट चीनने नवीन संसद भवनावरून भारतातील मोदी सरकारचे जाहीर कौतुक केले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ग्लोबल टाइम्समध्ये भारतात बांधल्या गेलेल्या नव्या संसद भवनाची दखल घेण्यात आली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. ब्रिटिशांच्या काळात जवळपास शतकापूर्वी बांधण्यात आलेल्या जुन्या संसदेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात येणार आहे. नवीन संसद भवन हा मोदी सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा मुख्य भाग मानला जातो. गुलामगिरीची प्रतिके मिटवून भारताची राजधानी मुक्त करणे हा त्याचा उद्देश आहे. नवीन संसद भवन केवळ एक इमारत नाही, तर आत्मनिर्भर भारताच्या उदयाची साक्षीदार बनेल, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात भारताला यश मिळावे
या इमारतीच्या निर्माणात मोर, कमळाचे फूल यांसारख्या राष्ट्रीय चिन्हांचा समावेश आहे. ही चिन्हे भारताच्या इतिहासाची आणि संस्कृतीची भक्कम वैशिष्ट्ये दर्शवतात. विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात भारताला यश मिळावे, अशा शुभेच्छा चीनच्या ग्लोबल टाइम्सने दिल्या आहेत.
दरम्यान, दुसरीकडे चीन आणि भारत यांच्यात तेढ निर्माण करण्यासाठी काही देश प्रयत्न करत आहेत. चीनची जमिन घेण्यासाठी भारताला चिथावणी देत आहे. चीन आणि भारत यांच्यातील सीमावादात ते भारताची बाजू घेतात आणि भारताला चीनच्या विरोधात उभे राहण्यास भडकवतात. आम्ही भारतासोबत आहोत. भारतासाठी हा त्या देशांचा सापळा आहे, हे समजून घेतले पाहिजे. भारताने अशा देशांच्या भू-राजकीय फंदात पडू नये, असा सल्लाही चीनने भारताला दिला आहे.