लंडन : ब्रिटनला अमेरिकेशी रस्ता मार्गाने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार असून, जगातील हा सर्वाधिक लांबीचा सुपर हायवे ठरणार आहे. हा रस्ता जगाची अर्धीअधिक प्रदक्षिणा करील असे संयोजकांचे म्हणणे आहे. १२ हजार ४०० मैल लांबीच्या या मेगा रस्त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून रशियाचा पश्चिम भाग ते बेरिंग खाडी असा हा मार्ग जाणार आहे. याच मार्गात पुढे येणारा अलास्का हा महत्त्वाचा टप्पा आहे. हा सुपर हायवे तयार करताना युरोप व आशियातील सध्या अस्तित्वात असणारे रस्तेही परस्परांशी जोडले जाणार असून, प्रवाशांना ब्रिटनमधून हायवेने थेट अमेरिकेपर्यंत जाण्याचा मार्ग यानिमित्ताने प्रथमच खुला होणार आहे.ट्रान्स सैबेरियन रेल्वे, तसेच तेल व वायूचे पाईप हायवेच्या बाजूने जातील. रेल्वेचे बोगदे रशियातील दुर्गम भागात असणाऱ्या चुकोत्का प्रांतालाही जोडतील अशी योजना आहे. जागतिक फुटबॉलपटू रोमन अब्रामोविच याने या प्रांताचा गव्हर्नर म्हणून काम केले असल्याने त्याचे महत्त्व थोडे अधिकच आहे. रशियातील रस्त्यांचा दर्जा निराशाजनक आहे, या रस्त्याचे बांधकाम करताना स्टॅलीनच्या राजकीय कैद्यांची हाडे झिजली असे बोलले जाते. या नव्या हायवेमुळे रशिया हे जगातील वाहतुकीचे मुख्य केंद्र बनेल. युरोप, आशिया व उत्तर अमेरिका यांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल ठरेल. थोडक्यात रशियन अर्थव्यवस्था पुन्हा नव्याने उभारी घेणार असे दिसत आहे.