बीजिंग : चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभर हाहाकार माजविला असतानाच, या देशात गोचिडीच्या माध्यमातून संक्रमित झालेल्या विषाणूच्या संसगार्मुळे गेल्या सहा महिन्यांत सात जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. या विषाणूची आतापर्यंत सुमारे ६० जणांना बाधा झाली आहे. या घडामोडीमुळे अनेकांच्या छातीत धडकी भरली आहे.
यासंदर्भात चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आहे. चीनमधील जिआंग्सू प्रांतामध्ये यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत गोचिडीतील विषाणूचा (एसटीएफएस) ३७ जणांना संसर्ग झाला होता. याच विषाणूमुळे या देशातील अनहुई प्रांतात २३ लोक आजारी झाले होते. या विषाणूचा संसर्ग झालेल्या एका महिलेला ताप व कफ झाला होता. तिच्या रक्तबिंबिका व पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आले होते. ही महिला नानजिंग प्रांतातील असून, तिच्यावर रुग्णालयात एक महिना उपचार करण्यात आले. या संसर्गाने अनहुई व झेजिआंग प्रांतातील सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गोचिडीतून संक्रमित झालेला विषाणू हा आधीपासूनच ज्ञात आहे. या विषाणूचा चीनमधील शास्त्रज्ञांनी २०११ साली सखोल अभ्यास केला होता. चीनमधील वुहान शहरातून कोरोना विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर त्या आजाराने आजवर लाखो लोकांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे चीनमधील कोणतीही साथ, आजार याकडे जागतिक आरोग्य संघटनेसह सर्व देश लक्ष ठेवून आहेत.