देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा अनेकदा प्रत्यय आपल्याला आला आहे. अनेक अपघातांमधून, मोठ्या दुर्घटनांमधून ही म्हण सत्यात उतरली आहे. आता, पुन्हा एकदा अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील एका भीषण अपघातातून जीव वाचलेल्या अमेरिकन नागरिकांबाबतीत ही म्हण खरी ठरली आहे. कॅलिफोर्नियाच्या डेविल्स स्लाईड भागात एक कार अपघात झाला आणि सुरु बचावकार्य झाले. सुदैवाने या अपघातातून चारहीजण बचावले. मात्र या अपघाताची खोलवर जावून चौकशी केली असता हा अपघात नसून आत्महत्येचा प्रयत्न असल्याचं समोर आलं.
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणारे 41 वर्षीय डॉक्टर धर्मेश पटेल यांनी आपल्या दोन्ही मुलं आणि पत्नीसह आत्महत्येचा प्लॅन केला होता. त्यासाठी त्यांनी कॅलिफोर्नियाच्या डेविल्स स्लाईड टेकडीची निवड केली. कारण तिथून पडलेली व्यक्ती वाचत नाही असा येथील इतिहास आहे. त्यानुसार, आपल्या टेस्ला गाडीत धर्मेश हे ४ वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांच्या मुलाला घेऊन संपूर्ण कुटुंबासह टेकडीवर पोहोचले, त्यावेळी वेगातच गाडी दरीत कोसळली. तब्बल 250 ते 300 फूट खोल दरीत गाडी पडली. मात्र, देव तारी त्याला कोण मारी... असा प्रत्यय येथे आला.
धर्मेश आणि गाडीत असलेले सर्वजण सुखरुप राहिले असून धर्मेश यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी दरीत ही गाडी कोसळताना पाहिली होती, त्यामुळे तात्काळ पोलीस आणि मदत यंत्रणेला फोन केला. त्यानंतर, मतदयंत्रणा आणि पोलीस प्रशासन तात्काळ तेथे दाखल झाले. यावेळी, हेलिकॉप्टरही मदत आणि बचावासाठी तेथे दाखल झाले होते. पोलिसांनी हायवेवरची वाहतूक धमी केली. तर दुसरीकडे बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर्सही पोहोचले. बचाव पथकाने गाडीतून आधी मुलांना आणि नंतर पटेल दाम्पत्याला बाहेर काढलं. त्यानंतर तिथून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आणि उपचार सुरु झाले. उपचार सुरू झाल्यानंतर अपघाताची चौकशी झाली.
दरम्यान, पटेल यांनी आत्महत्या करण्याचा का निर्णय घेतला, यामागचे कारण काय या सगळ्या बाबींची चौकशी गुन्हा दाखल झाल्यानंतर होणार आहे. तसेच, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.