लंडन : दुसऱ्या महायुद्धादरम्यान बेपत्ता झालेली नाझींची सोने व रत्ने-माणकांनी भरलेली रेल्वे हुडकून काढल्याचा दावा दोन ट्रेझर हंटर्सनी (खजिना शोधण्याचे काम करणारे) केला आहे. ही गूढ रेल्वे हंगेरीहून जर्मनीला येत असताना बेपत्ता झाली होती. या रेल्वेत बंदुका, रत्नमाणके, सोने आणि चित्रे असा २०० दशलक्ष डॉलरचा ऐवज असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.पूर्व जर्मनीच्या व्रॉत्स्लाफमध्ये सोव्हियत लष्कराच्या हल्ल्यादरम्यान १९४५ मध्ये ही रेल्वे बेपत्ता झाली होती. ही रेल्वे शोधल्याचा दावा करणाऱ्यांपैकी एक जण जर्मनीचा, तर दुसरा पोलंडचा नागरिक आहे. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी या रेल्वेचा शोध लावला त्या दोघांना या मालमत्तेतील दहा टक्के वाटा हवा आहे, त्याशिवाय या रेल्वेचा ठावठिकाणा सांगण्यास या दोघांनी नकार दिला आहे. दरम्यान, या रेल्वेच्या शोधाचे वृत्त स्थानिक कहाण्या, कथांशी मिळतेजुळते असल्याचे रेडिओ व्रॉत्स्लाफने म्हटले आहे. या कहाणीनुसार, सोने, रत्ने आणि दागिन्यांनी भरलेली रेल्वे युद्धादरम्यान शॉज कॅसलजवळ बेपत्ता झाली होती. ही रेल्वे बोगद्यात शिरली व तेथून बाहेर निघू शकली नाही. नंतर हा बोगदा बंद करण्यात आला होता. पुढे ही बाब विस्मृतीत गेली. ही चिलखती रेल्वे १५० मीटर लांब, तसेच तिच्यात ३०० टन सोने असल्याचे सांगितले जाते. नाझी या रेल्वेद्वारे लुटीचा ऐवज बर्लिनला नेत असत. ही रेल्वे हुडकून काढल्याचा दावा करणाऱ्याच्या विधि संस्थेने संपर्क साधला असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
पोलंडमध्ये सापडली सोन्याने भरलेली रेल्वे?
By admin | Published: August 21, 2015 10:21 PM